कोल्हापूर जिल्हा परिषदेत अखेर भाजपची सत्ता

By admin | Published: March 21, 2017 04:11 PM2017-03-21T16:11:13+5:302017-03-21T16:11:13+5:30

अध्यक्षपदी शौमिका महाडिक ९ मतांनी विजयी, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

At the end of Kolhapur Zilla Parishad, BJP's power | कोल्हापूर जिल्हा परिषदेत अखेर भाजपची सत्ता

कोल्हापूर जिल्हा परिषदेत अखेर भाजपची सत्ता

Next



काँग्रेसचे दोन सदस्य अनुपस्थित : लोकमतचे वृत्त तंतोतंत खरे
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : अत्यंत चुरशीची ठरलेली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक अखेर भारतीय जनता पक्षाने जिंकली. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका अमल महाडिक यांना ६७ पैकी ३७ मते मिळाली, तर उपाध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांनाही ३७ मते मिळाली. काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले बंडा माने यांना २८ मते मिळाली, तर उपाध्यक्षपदाचे उमेदवार जयवंतराव शिंपी यांनाही २८ मते मिळाली.याबाबत लोकमतने सोमवारी दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले. या निवडणुकीतील विजयामुळे भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेत सत्ता मिळविली आहे.या निवडणुकीमुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे जिल्हाच्या राजकारणातील वर्चस्व सिध्द झाले आहे.
शौमिका महाडिक अध्यक्ष होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बांधकाम, जनसुराज्य शक्ती पक्षाला समाजकल्याण, राहुल आवाडे यांना शिक्षण, अरुण इंगवले यांना आरोग्य अशी पदांची वाटणीही निश्चित झाली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सभागृहाबाहेर महाडिक समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करुन आनंद व्यक्त करण्यात येत होता.
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांचे नावे जाहीर झाले होते, पण रात्रीतून नव्या घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसने नंतर अध्यक्षपदासाठी बंडा माने तर उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली. मंगळवारी सकाळीच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत माजी आमदार पी. एन. पाटील यांची वादावादी झाली. आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी या आमदारांवर केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांची चढाओढ मंगळवारी सकाळीही कायम होती. ताज्या घडामोडीनुसार कोणत्याही परिस्थितीत भाजता आघाडीशी हातमिळविणी करणार नाही, आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप काढणाऱ्या शिवसेनेने अचानक युटर्न घेत पक्ष अध्यक्षपदाची निवडणुक लढविणार नाही, अशी भूमिका घेतली. शिवसेनेचे शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील यांनीही आज सकाळी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजता आघाडीचे संख्याबळ वाढले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचा आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा अशी नवी तडजोड झाली आहे. यामुळे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. तशा सूचना हॉटेल अयोध्या येथे सकाळी झालेल्या बैठकीत सर्व नूतन जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बेळगावकडे रवाना झाले.

अतिशय वेगाने घडलेल्या घडामोडीनंतर भाजता आघाडीकडे ३७ सदस्यांचे संख्याबळ झाल्याने हे सर्व सदस्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या बंगल्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार शौमिका महाडिक, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, हिंदुराव शेळके, राहुल आवाडे, जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसच्या गोटात मोठा बदल झाला आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका कायम ठेवत पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांना विरोध केल्यामुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सकाळी अध्यक्षपदासाठी बंडा माने आणि उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांची सकाळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याबरोबर वादावादी झाली. दोघांनीही आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला.बजरंग देसाई आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे दोन सदस्य निवडणुकप्रसंगी अनुपस्थित राहिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आणखी घटले.

Web Title: At the end of Kolhapur Zilla Parishad, BJP's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.