हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब
By admin | Published: July 27, 2016 12:54 AM2016-07-27T00:54:51+5:302016-07-27T00:55:16+5:30
मुख्यमंत्र्यांची झाली स्वाक्षरी : अधिसूचना आज किंवा उद्या लागू होणार; ४४ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला
भारत चव्हाण -मुंबई --कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. ही अधिसूचना आज, बुधवारी किंवा उद्या, गुरुवारी लागू करण्यात येईल, असे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
हद्दवाढीचा निर्णय झाल्यानंतर प्रस्तावित गावांतून कितपत प्रतिकूल प्रतिक्रिया उमटतील, याचा अंदाज सरकार घेत असल्याने अधिसूचना लागू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला; अन्यथा ही अधिसूचना मंगळवारीच लागू करण्यात येणार होती.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासून अनुकूल आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही, अशी महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांतदादा पाटील यांना दोन नंबरचे स्थान असल्याने दादांनीच ठरवल्यावर हद्दवाढीचा निर्णय घेण्यास सरकारच्या पातळीवर कोणतीही अडचण नाही. परंतु, हा निर्णय आता इतक्या तातडीने घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत आहे. त्यांची निवडणूकविषयक कामाची प्रक्रिया १ सप्टेंबरला सुरू होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो १ सप्टेंबरपूर्वीच शासनाने घ्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत.
१ सप्टेंबरपूर्वी हद्दवाढीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याची प्रक्रिया किमान महिनाभर आधी सुरू होणे आवश्यक आहे. कारण अधिसूचना लागू केल्यानंतर हरकती आणि सुनावणीसाठी महिनाभराचा किमान कालावधी देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. या सगळ्या गोष्टींवर विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मंगळवारी सकाळी सही केली आहे. अधिसूचना मंगळवारी लागू होणार हे समजल्यावर हद्दवाढीला विरोध करणारे शिवसेनेचे सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन, हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये प्रचंड विरोध असून, राज्य शासनाने त्याची दखल न घेतल्यास उद्रेक होऊ शकेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. यावर कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा निर्णय आता नाही झाला तर भविष्यात अडचणी वाढतील, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस यंत्रणेमार्फत हद्दवाढ झाल्यास काय पडसाद उमटू शकतात, यासंबंधीची माहिती जाणून घेतली. पोलिस यंत्रणेने, हद्दवाढीत प्रस्तावित १८ गावांमध्ये आज, बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असून, लोकांत संतप्त प्रतिक्रिया असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी लागू होणारी अधिसूचना थांबवली. परंतु, ती दोन दिवसांत लागू होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
अठरा गावांत आज बंद
हद्दवाढीविरोधात आज, बुधवारी १८ गावांत बंद पाळण्यात येणार आहे. शिवाय ठिकठिकाणी
‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी प्रस्तावित गावांमधील सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी घेतला. तसेच हद्दवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा अहवाल शासनाला सादर करा, या मागणीचे
निवेदन समितीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. -वृत्त/३
अशी आहेत
प्रस्तावित गावे...
१) सरनोबतवाडी २) गडमुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव
५) पाचगाव ६) मोरेवाडी
७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे
९) कळंबे तर्फ ठाणे १०) उचगाव ११) शिरोली १२) वाडीपीर
१३) वडणगे १४) शिये
१५) शिंगणापूर १६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर.
फक्त वाढीव क्षेत्रातच निवडणुका
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्यास वाढीव क्षेत्रापुरती राज्य शासनाच्या सूचनेनुसार निवडणूक घेण्यात येईल, तसेच मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हद्दवाढ झाल्यानंतर संपूर्ण शहरात महानगरपालिकेची पुन्हा निवडणूक होईल याबाबत शहरात चर्चा सुरू आहे; पण आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्य शासनाकडून हद्दवाढीबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर या हद्दवाढीच्या सूचनेबाबत शहरवासीयांना उत्सुकता लागून राहिली होती. हद्दवाढ झाल्यास (पान १२ वर)