हंगामाच्या शेवटी ‘ब्याडगी’चा ठसका, क्विंटलला हजाराची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:57 AM2019-05-13T10:57:17+5:302019-05-13T11:03:32+5:30
लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.
कोल्हापूर : लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.
यंदा लाल मिरचीची आवक चांगली राहून ग्राहकांना दिलासा मिळेल असे सांगितले जात होते. सुरुवातीच्या टप्प्यात मिरचीचे दर साधारण राहिले. आता मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दर चांगलेच कडाडले आहेत. ‘ब्याडगी’ १६० रुपये, ‘जवारी’ १३०, तर ‘लवंगी’ १४० रुपये किलोपर्यंत राहिली आहे. सरासरी क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आणखी आठ ते दहा दिवस हंगाम तेजीत राहील, त्यानंतर हळूहळू कमी होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
पालेभाज्यांच्या दरात कमालीची घट झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मेथीची पेंढी हातात घेण्यासही भीती वाटत आहे. (छाया - दीपक जाधव)
कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक गेले पंधरा दिवस मंदावली आहे. या आठवड्यात तर बाजार समितीत रोज कशीबशी ५०० पेंढ्यांची आवक होते. त्यामुळे दरात वाढ झाली असून, घाऊक बाजारात पेंढीचा दर २० रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मेथीची विक्री कशी करायची, असा पेच विक्रेत्यांसमोर आहे.
पालक, पोकळा, शेपू, कांदा पातीचे दरही १५ ते २० रुपये पेंढी आहे. भाजीपाल्याची आवक कमी-अधिक असल्याने दरात चढउतार दिसत आहे. वांगी, टोमॅटो, ढब्बू, ओला वाटाणा या भाज्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून कोबी, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरची आवक स्थिर असून, किरकोळ बाजारात २० रुपये दर आहे.
फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील हापूसबरोबरच मद्रास हापूस व पायरी आंब्याची आवक झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी घसरण झाली आहे. मद्रास हापूसच्या पेटीमागे सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात हापूसचा बॉक्स १५० पासून २५० रुपयांपर्यंत आहे. लिंबूची मागणी कायम असून, दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दर चढेच राहिले आहेत. साखर, सरकी तेल, शाबूसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा फरक झालेला नाही.
घाऊक बाजारातील आंब्याचा दरदाम-
आंबा आवक सरासरी दर
हापूस ६८० पेटी १२०० रुपये
हापूस १०१२० बॉक्स २२५ रुपये
पायरी ४० बॉक्स ९० रुपये
लालबाग ५०० बॉक्स १०० रुपये
मद्रास हापूस २०० पेटी ६५० रुपये
मद्रास हापूस १००० बॉक्स १२५ रुपये
मद्रास पायरी ५०० बॉक्स १०० रुपये
मिरचीची मागणी आणि आवक यात मोठी तफावत असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. चांगल्या मालाचे दर सुरुवातीपासूनच चढे राहिले आहेत.
- भगवान लोखंडे,
मिरची विक्रेते, रुकडी