शिरोळला अखेर तंटामुक्तीची गुढी
By Admin | Published: March 22, 2015 10:30 PM2015-03-22T22:30:36+5:302015-03-23T00:42:59+5:30
तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर : विशेष शांतता पुरस्कारही मिळणार
संदीप बावचे -शिरोळ तब्बल पावणे दोन वर्षानंतर अखेर शिरोळ तंटामुक्तीचा गजर झाला असून गावाला राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये विशेष करून शिरोळला ‘विशेष शांतता पुरस्कार’ही जाहीर झाल्यामुळे शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ही संकल्पना निश्चितच अंमलात आली आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी व शिरोळ वगळता सर्वच गावे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात उत्तीर्ण होऊन लखपती बनली होती. शेती, औद्योगिक, सहकार, दुग्ध व्यवसाय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या तालुक्यात तंटामुक्तीचा गजर होऊन तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी सात वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाची घोषणा केली. त्यासाठी गावागावांत तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील अनेक गावे तंटामुक्त झाली. मात्र, तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ हे तंटामुक्त अभियानापासून अलिप्त होते. या गावात राजकीय तंटा टोकाचा असल्यामुळे आतापर्यंत या गावाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. मात्र, आॅगस्ट २०१३ मध्ये तंटामुक्तीसाठी शिरोळने पुढाकार घेऊन जणू विडाच उचलला होता.गाव तंटामुक्त करून कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्तीचे बक्षीस पटकावयाचे हीच जिद्द गाव पुढाऱ्यांनी बाळगली होती. शिरोळ पोलिसांनीही त्याला प्रोत्साहन दिले. तंटामुक्त अभियानासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यामुळे शांततेतून समृद्धीकडे वाटचाल अखेर यशस्वी झाली आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार शिरोळला जाहीर झाला आहे. शिवाय गावाची विशेष शांतता पुरस्कारा साठीही निवड झाली असून १२ लाख ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे.
शांततेकडून समृद्धीकडे वाटचाल
एकीचे बळ
महात्मा गांधी तंटामुक्त
अभियानात ग्रामस्थांनी दिलेला सहभाग निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. टोकाचे राजकारण असणाऱ्या तालुक्याच्या गावात तंटामुक्त हे एक आव्हानच होते. मात्र, सर्वांच्याच पुढाकाराने तंटामुक्तीचा गजर अखेर यशस्वी झाला.
- पांडुरंग माने, तंटामुक्त अध्यक्ष
शासनाचे पाठबळ
तंटामुक्त अभियानात यशस्वी होण्याचा निर्धार केला होता. शिरोळ पोलीस, महसूल यासह अन्य शासकीय विभागाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. यामुळे आम्ही तंटामुक्तीचा घेतलेला विडा पूर्ण केला आहे. यामध्ये सरपंच, सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले.
- पृथ्वीराज यादव, उपसरपंच
समन्वयामुळे यश
गावातील सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळींच्या समन्वयामुळेच तंटामुक्त अभियानात शिरोळला विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गावाने तंटामुक्त अभियानात यशस्वी वाटचाल केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या मार्गदर्शनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले असून शिरोळला मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद आहे.
- विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक, शिरोळ