तुडयेत अखेर बाटली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:25 AM2018-01-15T00:25:35+5:302018-01-15T00:26:06+5:30
चंदगड : चंदगड तालुक्यातील तुडये गावात रविवारी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत अखेर बाटली आडवी केली. रविवारी झालेल्या मतदानात एकूण १६०४ पैकी १२४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला १०२१ तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते बाद ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी काम पाहिले.
तुडये गावात मध्यवस्तीमध्ये पी. टी. गुरव, एम. डी. हुलजी, लक्ष्मण सातेरी व दयानंद कृष्णा मोहिते यांची दारू दुकाने होती. सायंकाळाच्या वेळेत महिलांना मद्यपींच्या त्रास होत असल्याने व गावात व्यसनाधीनता वाढल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे गावात दारूबंदी करून दुकाने बंद करावीत किंवा स्थलांतरित करावीत अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणूक घेऊन गावातील दारूबंदी करावी, असा आदेश चंदगड तहसीलदार यांना दिला. त्यानुसार रविवारी संक्रांतीदिवशी तुडये गावात मतदान घेण्यात आले.
मतदानप्रक्रिया स्लीपद्वारे घेण्यात आली. रात्री ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी नांगरे यांनी निकाल जाहीर करताच समर्थक, महिला, युवक वर्ग यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी संजय राजगोळे, तलाठी शरद नाकाडी, ग्रामसेवक यांनी काम पाहिले.
शारदा बसरीकट्टी, अनिता पाटील, सिंधू हुलजी, चांगुणा मोहिते, कस्तुरी झाजरी, नंदकुमार पाटील, सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच शिवाजी कांबळे, उपसरपंच मधुकर पाटील, सर्व संस्थांचे पदाधिकारी, महिला, बचत गट, युवक मंडळांनी घेतलेल्या प्रयत्नातून दारूबंदी
झाली.