पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:47 AM2018-06-07T00:47:00+5:302018-06-07T00:47:00+5:30
इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची
संतोष बामणे ।
उदगाव : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची योजना हाणून पाडली. त्यानंतर इचलकरंजीला कोथळीतील कृष्णा-वारणा संगमावरील पर्याय समोर होता. इतक्यात कोथळी ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविल्याने इचलकरंजी शहर व शिरोळ तालुका यामध्ये सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मात्र वाढत चालला आहे.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून अमृत योजना मंजूर झाल्यापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, अशी आशा होती. मात्र, वारणा नदीतील पाण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे वारणाकाठच्या शेतीला व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासतअसल्याने इचलकरंजीला वारणेचे पाणी देणार नाही, यावरून गेल्या दोन वर्षांपासून घडामोडी व संघर्ष सुरू आहे. अखेर मुंबई येथील बैठकीत दानोळी येथून अमृत योजना रद्द झाल्याचा निर्णय झाला. तसेच कोथळी-हरिपूर येथील कृष्णा- वारणा नदीच्या संगमापासून मजरेवाडीपर्यंतच्या कृष्णाकाठावर प्राधिकरण विभागाने उपसा केंद्राची जागेची पाहणी करून योजना आणावी, असे बैठकीत ठरले होते. अशातच दानोळीच्या विषयावर पडदा पडतो इतक्यातच कोथळीकरांनी संगमातून पाणी नेण्यासाठी कडकडून विरोध दर्शविला आहे.
कृष्णा-वारणा संगमावर प्राधिकरण विभागाचे अधिकारी अचानक पाहणी करायला आले होते. त्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले. दुसºया दिवशी इचलकरंजी शहराला पाणी द्यायचे नाही, या विरोधात सर्वपक्षीय बैठक घेऊन गावबंद ठेवले. तसेच शेतकरी नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चाही झाली. तसेच कृष्णाकाठावरील असलेल्या
सर्वच गावांना एकत्रित करण्याचे काम कोथळी गावाने सुरू केले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला कृष्णा-वारणा नदीचा संगम ते मजरेवाडीपर्यंत पाणी द्यायचे नाही, यावर निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचा व इचलकरंजी शहराचा संघर्ष वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वारणाकाठच्या व कृष्णा नदीकाठच्या जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा,अशीे मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.
जनतेचा विचार महत्त्वाचा
इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी आहे. ही नदी इचलकरंजी शहरामुळेच प्रदूषित झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊन आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच इचलकरंजी शहराला वारणेतून पाणी देण्याचा हट्ट इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींचा आहे. मात्र, हा हट्ट करण्याऐवजी कृष्णा व वारणाकाठच्या जनतेच्या लोकप्रतिनिधींनी विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा कोणतेही संकट आल्यास त्यासाठी आम्ही तयार असल्याचे कोथळी सरपंच अमृत पाटील-धडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत कोथळी-हरिपूर संगम ते मजरेवाडीपर्यंत देण्याचा निर्णय झाला आहे. इचलकरंजीसाठी सध्या पंचगंगा व कृष्णा येथून पाणीपुरवठा होतो. अशातच शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मतासाठी पाण्याचे राजकारण इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी करू नये, अन्यथा कोथळीकर एकीचे बळ दाखवतील.
- राजगोंडा पाटील,
पं. स. सदस्य, कोथळी.