‘भाजप’च्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू : मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:40 AM2019-01-29T00:40:39+5:302019-01-29T00:40:45+5:30
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या ...
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू झाल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.
थापाड्या सरकारला लोक कंटाळले असून, त्यांनी राज्यात व देशातही परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सभेत सांगितले.राष्टÑवादीच्या परिवर्तन यात्रेत सोमवारी सायंकाळी येथील मुस्कान लॉन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
मुंडे म्हणाले, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी जरा महाराष्टÑाच्या मंत्रिमंडळात डोकावून पाहावे. आमच्यावर टीका करणाºया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर महापुरुषांच्या फोटोत घोटाळा केला. सरकारी प्रेसमध्ये पूर्वी ५२ रुपयांना मिळणारे महापुरुषांचे फोटो १७०० रुपयांना माथी मारले. त्यांच्यासह १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटींचा घोटाळा केला. माझा आरोप खोटा असला तर मुख्यमंत्र्यांनी खुशाल मला चौकात फाशी द्यावी; पण हे सरकार मंत्र्यांना पाठीशी घालत असून, १५ वर्षांच्या नवसाने भाजपला मिळालेले सत्तेचे मूल घोटाळ्यामुळे २०१९ मध्ये घरी जाणार आहे. मोदी लाटेत कोल्हापूरकरांनी धनंजय महाडिक यांना खासदार केले. आता कोणतीच लाट नसल्याने ‘बस एकच निर्धार पुन्हा धनंजय महाडिकच खासदार’ असे आवाहनही मुंडे यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय महाडिक यांचे लोकसभेतील कामकाज उत्तम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे जरी असले तरी पक्षातील छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याची गरजही पक्षाला आहे. हलक्या कानाचे राहू नका. कॉँग्रेसलाही सोबत घेऊन पुढे जायचे असून, कोणालाही बोट ठेवायला जागा नको.
खासदार महाडिक म्हणाले,‘भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार असून, देशात २५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या. देशात कोणताही घटक समाधानी नाही. कोल्हापूरची विमान सेवा, रेल्वे, पासपोर्टसह अनेक प्रश्न मार्गी लावलेच, त्याशिवाय संसदेत प्रभावी कामगिरी केल्यानेच तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मान झाला.’
यावेळी आर. के. पोवार यांनी स्वागत केले. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, अशोकराव जांभळे, संग्राम कोते-पाटील, अनिल साळोखे, राजेश लाटकर, आदिल फरास, जहिदा मुजावर, संगीता खाडे, रोहित पाटील, आदी उपस्थित होते.
मुले कॉँग्रेसची, बारसे भाजपकडून
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसमधील लोक घ्यायचे, त्यांच्यावर पैसा लावून विजय मिळवायचा आणि ‘कमळ’ फुलल्याचे सांगायचे. हे म्हणजे मुले दोन्ही कॉँग्रेसची आणि बारसे भाजपकडून, अशी अवस्था आहे.