गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना बसला विजेचा धक्का; तरुण अभियंत्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:05 PM2024-08-31T18:05:34+5:302024-08-31T18:06:29+5:30

कोल्हापुरात णेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाला विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

Engineer dies due to electric shock while installing welcome board for Ganeshotsav | गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना बसला विजेचा धक्का; तरुण अभियंत्यांचा मृत्यू

गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना बसला विजेचा धक्का; तरुण अभियंत्यांचा मृत्यू

शिवाजी सावंत 
गारगोटी : गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.अरूण रमेश वडर (वय २३, रा.शिवाजी नगर,गारगोटी)असे त्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी,अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने तरुण मंडळाचे स्वागत फलक उभारण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक तरुण मंडळाचे सदस्य बसस्थानक परिसरातील गारगोटी कोल्हापूर मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत फलक लावत होते. त्यावेळी अनवधानाने या फलकाचा उच्चविद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला स्पर्श झाला.

विजेचा प्रवाह सुरू असल्याने फलक धरलेल्यांना जोराचा धक्का बसला. यामध्ये अरूण रमेश वडर यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीधर वडर,अमोल सुतार,अविनाश भोपळे,सौरभ शालबिद्रे,विशाल वडर (सर्वजण रा.शिवाजीनगर,गारगोटी)हे पाचजण  धक्याने रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंतजनक आहे. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे प्राथमिक उपचार करून सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यत जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जून आबिटकर,शेखर देसाई रुग्णालयात उपस्थित होते.

नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अरूण याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. या परिस्थितीत त्यांने आपले इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले होते. एकुलत्या एका तरुण मुलावर काळाने झडप घातल्याने वडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडिल एकुलत्या एका मुलाचा आधार हरपल्याने धायमोकलून रडत आहेत. तर संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गेल्या दोन दिवसापासुन तालुक्यातील सर्व गावांत गणेश उत्सव तरुण मंडळांचे उत्साही तरुण गणेशोत्सव फलक,स्वागत कमानी,मंडळांचे नेत्यांचे,पदाधिकारी यांचे डिजिटल फलक लावण्यासाठी चढाओढ करीत आहेत. रस्त्याच्या कडेला आणि जागा मिळेल तिथे विद्युत पुरवठा सूरू असलेल्या खांबाला टेकून डिजिटल फलक लावण्यात तरुणाई मग्न आहे. त्यांना याचे भान नसल्याने जिवावर बेतू शकते. पण या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी आपल्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असे फलक लावल्यास कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डॉ. सुतार यांच्या प्रथमोपचाराने जीव वाचला... 

धक्का बसल्याने अविनाश भोपळे यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने डोक्यास गंभीर इजा झाली होती. त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून डॉ. सुतार यांच्या दवाखान्यात नेले. डॉ.सुतार यांनी तातडीने प्राथमिक उपचार केल्याने भोपळे यांचा जीव वाचला असल्याचे घटनास्थळावर बोलले जाते होते.
 
"तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचे फलक लावताना विजेच्या खांबाचा अथवा विद्युत प्रवाह असलेल्या तारांपासून सुरक्षित अंतरावर फलक उभारावेत.स्वतःची आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी," - प्रांताधिकारी हरेश सुळ 

Web Title: Engineer dies due to electric shock while installing welcome board for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.