नोकरी गेल्याने अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:42 AM2017-12-18T00:42:19+5:302017-12-18T00:43:50+5:30
कोपार्डे : खुपीरेपैकी शिंदेवाडी (ता. करवीर) येथील स्वप्निल दाजी वडगावकर (वय २४) या युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्येतून रविवारी पहाटे घरात गळफास लावून आत्महत्या केली. एकुलत्या मुलाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
स्वप्निल हा मॅकेनिकल इंजिनिअर होता. काही दिवस त्याने पुणे येथे एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी केली होती. मात्र, ती कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेल्याने तो निराश होता. स्वप्निल कोल्हापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला जात होता, पण तिथे मिळणारा पगार तुटपुंजा वाटत असल्याने तो नाराज होता. आई-वडिलांनी शिक्षणासाठी केलेल्या खर्चाचा ताण त्याच्या मनावर असल्याने स्वप्निलला त्याचे वडील समुपदेशन करत होते. त्याचे नैराश्य दूर करण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करीत होते. नातेवाइकांनीही स्वप्निलला धीर देत चांगली शेती आहे. त्याशिवाय एकुलता आहेस, असा सल्लाही दिला होता. त्यानंतर तो काही दिवस मिळून मिसळून वागल्याने आई-वडील काहीसे निश्चिंत झाले होते.
रविवारी पहाटे पाच वाजता स्वप्निलचे आई- वडील व लहान बहीण गोठ्याकडे गेले होते. दूध नेण्यासाठी स्वप्निल बराच वेळ झाला तरी आला नाही म्हणून बहीण घरी आली, तर स्वप्निलने घरात माडीवर दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. बहिणीने आरडाओरडा केल्यावर आई-वडील व नातेवाइकांनी घराकडे धाव घेतली, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्निल हा आई-वडिलांना एकुलता होता.