इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळावी : पी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:15+5:302020-12-23T04:22:15+5:30
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी माफी सवलत २० टक्के द्यावी, अशी मागणी आ. ...
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी माफी सवलत २० टक्के द्यावी, अशी मागणी आ. पी. एन. पाटील यांनी तंत्रशिक्षण उच्चमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आ. पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे या शैक्षणिक वर्षात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फार मोठा फटका बसला आहे. एकीकडे व्यवसाय बंद होते तर प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांची फी भरणे सक्तीचे झाले होते. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरण्यासाठी सध्या पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून इंजिनिअरिंग कॉलेजला असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी माफीमध्ये सवलत द्यावी, यासंदर्भात संबंधित खात्याशी बोलून निर्णय घ्यावा, असे देखील आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारच्यावतीने इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फीमाफीचा निर्णय झाल्यास तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचा विचार करून आपण मागणी केली असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.