अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:04 PM2019-03-29T16:04:00+5:302019-03-29T16:05:38+5:30
अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.
कोल्हापूर : अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.
यावर्षी बॅकलॉग आणि सेमिस्टरचे पेपर एप्रिलमध्ये एकत्रितपणे सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडला आहे. काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग व चालू सेमिस्टरचे विषयांचे पेपर एकाच दिवशी होणार आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यास एका कोणत्या तरी पेपरला मुकावे लागणार आहे.
परीक्षांना काहीच दिवस शिल्लक राहिले असून, हा वेळ महाविद्यालयातील सबमिशन, चाचणी परीक्षा, प्रोजेक्ट, सेमिनार तयार करणे, तोंडी परीक्षा देणे यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अभ्यासासाठी कमी अवधी मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांचे रि- चेकिंगचे रिझल्ट लागलेले नाहीत. परीक्षा पूर्ववत नियोजित वेळेत मे महिन्यात घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या परीक्षेचा कालावधी पूर्ववत करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. यावेळी युवासेनेचे ऋतुराज क्षीरसागर, योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, आदी उपस्थित होते.
निवडणुकीच्या कालावधीत पेपर नको
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अभियांत्रिकी विभागाचे पेपर घेण्यात येवू नयेत, अशी मागणी स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी विद्यापीठ प्रशासनाला शुक्रवारी दिले.
अभियांत्रिकीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्रमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचे पेपर सलग घेण्यात येवू नयेत. त्यात त्यांना अवधी देण्यात यावा. या परीक्षेचा कालावधी वाढविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी मंजीत माने यांनी कुलगुरुंना गुरुवारी दिले.