"मराठीतून मिळणार अभियांत्रिकीचे शिक्षण, नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य"
By संताजी मिठारी | Published: August 31, 2022 11:02 AM2022-08-31T11:02:16+5:302022-08-31T11:03:56+5:30
विद्यार्थ्यांना मराठीतून मूलभूत संकल्पना आत्मसात करता येतील
कोल्हापूर : नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य आहे. त्यानुसार तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून मूलभूत संकल्पना आत्मसात करता येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
विद्यापीठ विकास मंचतर्फे आयोजित सत्कारावेळी ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमात मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्याची खंत आहे. आपण नोंदणी केली; पण मतदारांना मतदानासाठी आणण्यात कमी पडलो. सिनेट निवडणुकीत तसे होऊ नये यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या. भारतीय मातीचा सुगंध असलेले शैक्षणिक धोरण आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये हे धोरण गतिमान होईल, असा विश्वास प्रा. पाटील यांनी व्यक्त केला.
संजय परमणे यांच्या कार्यवृत्तांत अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अभिजित पाटील, एन. बी. गायकवाड, पंकज मेहता, विशाल गायकवाड, केशव गोवेकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, हर्षवर्धन पंडित, आदी उपस्थित होते. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राहुल माने यांनी आभार मानले.