अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करणे गरजेचे
By admin | Published: March 8, 2016 12:24 AM2016-03-08T00:24:42+5:302016-03-08T00:49:40+5:30
विश्वास कदम : भारती अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय परिषद
कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाबरोबर इतर कौशल्येही विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजेत. अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत, असे आवाहन ब्रुनेई शेल पेट्रोलियम कंपनीतील कम्प्लायन्स व गव्हर्नन्स विभागाचे माजी प्रमुख प्रा. विश्वास कदम यांनी केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. एस. एच. सावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता चौगुले होत्या.यावेळी सावंत म्हणाले, अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांतील विद्यार्थ्यांना भविष्यात आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. बदलत्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. अशावेळी अभियंत्यांनी नवनिर्मितीचा ध्यास बाळगून प्रयत्नशील राहावे.बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख व माहिती विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले होते. विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या २३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थी, संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही झाले.
परिषदेला व्यवस्थापक व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. जे. कदम, मुख्य समन्वयक प्रा. ए. पी. कदम, प्रशासकीय अधिकारी राहुल कदम, सर्व विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रा. एस. के. कदम यांनी केले. प्रा. एस. टी. घुटुकडे यांनी आभार केले. ( प्रतिनिधी )