निर्माल्याच्या पर्यायी व्यवस्थेसह प्रबोधन करा

By Admin | Published: August 6, 2015 01:02 AM2015-08-06T01:02:44+5:302015-08-06T01:13:48+5:30

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी बैैठक : विभागीय आयुक्तांच्या जिल्हा प्रशासन, महापालिका यांना सूचना

Enlighten with the alternative arrangement of the building | निर्माल्याच्या पर्यायी व्यवस्थेसह प्रबोधन करा

निर्माल्याच्या पर्यायी व्यवस्थेसह प्रबोधन करा

googlenewsNext

कोल्हापूर : गणेशोत्सवातील निर्माल्य थेट नदीत टाकू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे हे निर्माल्य नदीत न टाकण्याबाबत नागरिकांचे जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी प्रबोधन करून यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना बुधवारी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिल्या तसेच साखर कारखान्यांना अतिरिक्त गाळपासाठी परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीशिवाय ती देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अन्ब्लगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहायक सचिव तपास नंदी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी न. ह. शिवांगी आदींची प्रमुख उपस्थिती होती
गणेश विसर्जनावेळी नदीत निर्माल्य टाकू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. याची यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जिल्हा प्रशासन व महापालिकेने अंमलबजावणी करावी. यासाठी पर्यायी व्यवस्था करून नागरिक व गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन करावे. आगामी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नदीत निर्माल्य टाकू नये, असे आवाहन करून विभागीय आयुक्त चोक्कलिंगम् म्हणाले, नदीचे प्रदूषण रोखून नदीचे पावित्र्य राखले जावे यासाठी गणेशोत्सव काळात निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेने तसेच नगरपालिकांनी आपापल्या परिसरात स्वतंत्र व्यवस्था करावी. नदी व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेषत: प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदीत टाकू नये, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेने पंपिंग स्टेशनबाबतच्या कामाला गती दिली असून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् म्हणाले, प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी केली असून सांडपाण्याचे नमुनेही संयुक्तपणे घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याबरोबरच कचरा टाकण्यासाठी जमीन घेतली असून पुढील कार्यवाही गतीमान केली आहे. जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्याची सूचना त्यांनी केली.
इचलकरंजी नगरपरिषद हद्दीमधील ११० किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करायचे असून आतापर्यंत २५ किलोमीटर पाईपलाईनचे काम नगरपालिकेने पूर्ण केले असून उर्वरित पाईपलाईनचे काम प्राधान्यक्रमाने करण्याची सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी या बैठकीत केली. इचलकरंजी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत ९ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते सुमारे १५० एकर जमिनीला उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती प्राथमिक कार्यवाही करण्यात आली आहे. हे कामही गतीने करण्याची सूचना या बैठकीत त्यांनी दिली.
साखर कारखान्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून घेण्याची सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी केली. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फतही साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त गाळप करताना साखर आयुक्त कार्यालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीशिवाय परवानगी देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित एमआयडीसी, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, इचलकरंजी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार, औद्योगिक विकास महामंडळाचे एस. एस. वराळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Enlighten with the alternative arrangement of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.