परिचारकांवर गुन्हा दाखल करा : भाकपची मागणी
By admin | Published: March 18, 2017 06:52 PM2017-03-18T18:52:17+5:302017-03-18T18:52:17+5:30
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : भारतीय जवानांबद्दल बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.
भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिख जवानांच्या महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या पध्दतीने विधान करुन जवानांसह त्यांच्या कुटूंबियांचा अपमान केला आहे. यामुळे जवानांसह त्यांच्या कुटूंबियांचे मनोधैर्यांवर परिणाम झाला आहे. परिचारक यांचे विधान राष्ट्रद्रोही आहे. या विधानामुळे विधानपरिषदेची अब्रु जाणार हे लक्षात आल्यावर जनआंदोलनामुळे नाईलाजास्तव परिचारकांना विधानपरिषदेतून डच्चू देण्यात आला. परंतु भाजप शासनाने त्यांच्यावर पध्दतशीरपणे टाळले आहे. त्यामुळे शासकिय अधिकारी या नात्याने प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात उमा पानसरे, नामदेव गावडे, दिलदार मुजावर, रमेश वडगणेकर, अनिल चव्हाण, सुमन पाटील, मुकुंद कदम, सुनील जाधव आदींचा समावेश होता.