संतप्त खेळाडूंचा इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना घेराव
By admin | Published: April 29, 2015 12:57 AM2015-04-29T00:57:46+5:302015-04-29T01:03:31+5:30
क्रीडांगणाची मागणी : दालनासमोर क्रिकेट खेळून केल्या भावना व्यक्त
इचलकरंजी : येथील जवाहरनगरमधील स्वामी अपार्टमेंट परिसरातील खुल्या जागेवर क्रीडांगण करावे, या मागणीसाठी खेळाडू व नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्षांना घेराव घालून आंदोलकांनी त्यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. काही आंदोलकांनी तर नगराध्यक्षांच्या दालनासमोरील रिकाम्या जागेत क्रिकेट खेळून क्रीडांगणाच्या आवश्यकतेची तीव्रता दाखवून दिली.जवाहरनगर परिसरात गट क्रमांक ६६ येथे चार एकर जागा असून, या जागेचा वापर उपनगरातील मुले क्रीडांगण म्हणून करतात. मात्र, ही जागा चार वर्षांपूर्वी सेव्हंथ डे स्कूलला क्रीडांगणासाठी देण्यात आली. आता या शाळेकडून या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करण्यास सरकारी स्तरावर मागणी केली होती, तर नगरपालिकेकडून पाण्याची नळजोडणी देण्यासाठी मागणी करण्यात आली. तसेच याठिकाणी विजेची जोडणीसुद्धा करून घेण्यात येणार असल्याचे समजले. सोमवारी (दि. २७) या जागेवर तात्पुरती शेडवजा इमारत उभारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या या परिसरातील खेळाडू व नागरिकांनी तात्पुरते शेड पाडून टाकले.ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित असावी. किंबहुना, त्याठिकाणी क्रीडांगण विकसित करावे, या मागणीसाठी खेळाडू व नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. त्यामध्ये मनोज हिंगमिरे, संतोष कुपटे, द्वारकाधीश खंडेलवाल, पिंटू शिकलगार, रियाज जमादार, भाऊ खवरे, आदींचा समावेश होता. मोर्चातील शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत नगरपालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे आणखीन संतप्त झालेल्या खेळाडू व नागरिकांनी नगराध्यक्षा बिरंजे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले.
यावेळी काही काळ गोंधळ उडाला होता. अखेर सर्वांना शांत करून नगराध्यक्षांनी ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात येईल. तसा विषय नजीकच्या सर्वसाधारण सभेत ठेवून मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)