यंत्रमागधारकांचे शासकीय यंत्रणेला साकडे
By admin | Published: August 6, 2015 09:43 PM2015-08-06T21:43:39+5:302015-08-06T21:43:39+5:30
सायझिंग कामगारांचा संप : सायझिंग कारखान्यांपाठोपाठ यंत्रमाग कारखाने बंद पडू लागले; तोडगा काढण्याची मागणी
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाला १७ दिवस झाल्यामुळे सायझिंग कारखान्यांपाठोपाठ आता यंत्रमाग कारखाने बंद पडू लागले आहेत. परिणामी संपामध्ये तोडगा काढण्यासाठी यंत्रमागधारक संघटना व राष्ट्रीय कॉँग्रेसने शासकीय यंत्रणेला साकडे घातले आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले. त्याच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने १ जुलैपासून बेमुदत संप चालू केला. परिणामी ९० टक्के सायझिंग कारखाने बंद आहेत. सायझिंग कारखान्यांकडून मिळणाऱ्या सूत बिमांचा पुरवठा थांबल्याने यंत्रमाग कारखाने आता मोठ्या संख्येने बंद पडू लागले आहेत. परिणामी कापड उत्पादनामध्ये साठ टक्के घट झाली असून, शहरात होणाऱ्या कापड खरेदी-विक्रीची शंभर कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.सध्या यंत्रमाग उद्योग मंदीमध्ये असून, बाजारात आर्थिक टंचाई आहे. अशा स्थितीमध्ये आता कापड उत्पादनसुद्धा थंडावले आहे. याचा परिणाम आणखीन दोन महिन्यांनंतर येणाऱ्या दसरा-दिवाळी सणांवेळी दिसणार आहे. त्यावेळी निर्माण झालेल्या आर्थिक तंगीमुळे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व कामगार यांना बेजार होण्याची वेळ येणार आहे. म्हणून शासनाने या संपामध्ये हस्तक्षेप करावा आणि तोडगा काढावा, यासाठी गुरुवारी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व शहर कॉँग्रेसने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रकाश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, नगरसेवक-नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि यंत्रमागधारक यांचा समावेश होता.दरम्यान, गुुरुवारीच यंत्रमागधारक जागृती संघटनेने जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जागृती संघटनेच्यावतीने इचलकरंजीमध्ये होणाऱ्या वारंवार संपाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. येथे होणाऱ्या संपामुळे इचलकरंजीच्या कापड बाजारपेठेवर अनिष्ट परिणाम होत असून, येथील वस्त्रोद्योग मोडकळीस येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना जिल्हाधिकारी सैनी यांनी, संबंधित घटकांची आज, शुक्रवारी बैठक बोलविण्यात येईल आणि त्या बैठकीत योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले. या शिष्टमंडळामध्ये विनय महाजन, सुरज दुबे, अशोक बुगड, कमल तिवारी, मोहन ढवळे, मनोज दाते, महेश दुधाणे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचा १ जुलैपासून बेमुदत संप
परिणामी ९० टक्के सायझिंग कारखाने बंद
सूत बिमांचा पुरवठा थांबल्याने यंत्रमाग कारखाने बंद पडत आहेत
कापड उत्पादनामध्ये साठ टक्के घट
कापड खरेदी-विक्रीची शंभर कोटी रुपयांची उलाढाल ठप्प