आधी इंटरनेट द्या, मग ‘आयटी’चे बोला :- कोल्हापुरातील उद्योजकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:55 AM2019-10-15T00:55:26+5:302019-10-15T00:57:08+5:30

त्यानंतर सन २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच ठोस धोरण आखले नाही. त्यामुळे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले आहे.

Enter the Internet first, then talk about 'IT' | आधी इंटरनेट द्या, मग ‘आयटी’चे बोला :- कोल्हापुरातील उद्योजकांची भावना

कोल्हापुरात स्थानिक आयटी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजारजणांना रोजगार उपलब्ध झाला आहे; मात्र ही इंडस्ट्रीज पायाभूत सुविधांच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देजागा हस्तांतरणांचेही त्रांगडे; दोन्ही सरकारच्या काळात ठोस मदत नाहीच

संतोष मिठारी ।
कोल्हापूर : शासनाची कोणतीही ठोस मदत नसताना केवळ स्वत:च्या ताकदीवर कोल्हापुरातील आयटी इंडस्ट्रीज कार्यरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याठिकाणी मोठा आयटी पार्क उभा करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आरक्षित केलेली जागा आधी हस्तांतरण करा. पुरेशी इंटरनेट कनेक्टिव्हीटी द्या. विमानसेवेत सातत्य राखा, अशी मागणी आयटी उद्योजकांची आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी (दि. १३) कोल्हापुरात सभा झाली. त्यामध्ये त्यांनी मोठा आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सध्याच्या आयटी इंडस्ट्रीजची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, बीपीओ, आदी माध्यमांतून कोल्हापुरातील स्थानिक उद्योजकांची संख्या, त्यांच्या व्यवसायाची उलाढाल गेल्या २५ वर्षांमध्ये वाढली आहे. अशा परिस्थितीत व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूर अंतर्गत ते संघटित झाले. या असोसिएशनद्वारे त्यांनी स्वतंत्र, नवा पार्क उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली.

कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकुलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये अँड्रॉईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. (पान ४ वर) येथील आयटी इंडस्ट्रीजवर सुमारे ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून, वार्षिक उलाढाल सुमारे ६० कोटींपर्यंत आहे. सुमारे साडेपाच हजारजणांना रोजगार मिळाला आहे. स्थानिक आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी असोसिएशनने कोल्हापूर आयटी पार्कच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन, महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यावर गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने टेंबलाईवाडी परिसरात सव्वा तीन एकर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित केली आहे. मात्र, अजून ती जागा असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेसह आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता लवकर होणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शासनाचे धोरण चुकले
राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १ मे २००२ रोजी कोल्हापुरातील पद्मावतीनगर परिसरात आयटी पार्कचे उद्घाटन झाले. या पार्कमध्ये २२ हजार स्क्वेअर फुटांची मोठी इमारत उभारून पायाभूत सुविधा तातडीने पुरविण्यात आल्या. बाहेरील कंपन्यांना संधी देण्याचे तत्कालीन शासनाचे धोरण चुकले आणि त्याचा फटका या पार्कला बसला. त्यानंतर सन २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच ठोस धोरण आखले नाही. त्यामुळे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले आहे.

 

स्थानिक आयटी उद्योजकांकडून उपलब्ध होणाऱ्या रोजगारांची संख्या वाढत आहे. ते लक्षात घेऊन आयटी पार्कसाठी महापालिकेने आरक्षित केलेली जागा असोसिएशनकडे लवकर हस्तांरित करावी. त्यामध्ये काही अडचणी असल्यास त्याची माहिती महापालिकेने द्यावी.
- एस. डी. सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूर

सध्या कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे. याठिकाणी बाहेरील देशातील कामे घेणे आणि स्थानिक उद्योगांना संगणक प्रणाली, तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे अशा दोन पद्धतीमध्ये आयटीचे काम चालते. सध्या कोल्हापूर हे आयटी इंडस्ट्रीजचा विकास, वाढीसाठी पोषक शहर आहे. त्यामुळे येथे पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. त्यामध्ये जागा उपलब्ध करून देणे. इंटरनेटची कनेक्टिव्हीटी वाढविणे. विमानसेवेतील सातत्य कायम ठेवणे, आदींचा समावेश आहे.
- विनय गुप्ते, आयटी उद्योजक

कोल्हापूरमध्ये आयटी पार्क हा होणे काळाची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोठी कॉर्पोरेट कंपनी येणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्किंग क्लचर तयार होईल. त्याचा स्थानिक कंपन्या आणि पदवी घेऊन बाहेर पडणाºया युवा पिढीला फायदा होईल. - ओंकार देशपांडे, आयटी उद्योजक

 

Web Title: Enter the Internet first, then talk about 'IT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.