‘दक्षिण’ला उत्साह, मतदारांच्या रांगाच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:08 AM2019-04-24T01:08:43+5:302019-04-24T01:08:47+5:30

कोल्हापूर : दिवसभर रणरणते ऊन असतानाही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदान करण्यासाठी मतदारांत अमाप उत्साह दिसून आला. शहराच्या उपनगरांत आणि ...

The enthusiasm of 'south', the ranks of the voters | ‘दक्षिण’ला उत्साह, मतदारांच्या रांगाच रांगा

‘दक्षिण’ला उत्साह, मतदारांच्या रांगाच रांगा

Next

कोल्हापूर : दिवसभर रणरणते ऊन असतानाही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदान करण्यासाठी मतदारांत अमाप उत्साह दिसून आला. शहराच्या उपनगरांत आणि गावामध्ये मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र होते. तपोवन, उचगाव, फुलेवाडी, आदी काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याचे प्रकार घडले; पण सर्वत्र मतदान सुरळीत व शांततेत झाले. कार्यकर्त्यांत मात्र ‘आमच ठरलंय’- ‘ध्यानात ठेवलंय’ची शेरेबाजी प्रत्येक केंद्रावर सुरू होती.
प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारले होते. पाळणाघर, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी व्हीलचेअर, प्रथमोपचारासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रारंभी काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरू करण्यास उशीर झाला; तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मशीन वेळेत सुरू न झाल्याने गोंधळ उडाला; पण काही वेळातच नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरामध्ये कोणतेही खासगी वाहन आणण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला होता. त्यावरून अनेक ठिकाणी पोलीस, कार्यकर्ते यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.
फुलेवाडी, जवाहरनगर, सुभाषनगर, बाबा जरगनगर, कळंबा, पाचगाव, गिरगाव, कंदलगाव, मोरेवाडी, उचगाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी या भागांत मतदान केंद्रावर रांगा दिसत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर ५० टक्के मतदान झाले होते. गिरगाव, कंदलगाव, मोरेवाडीत शेतकरी मतदारांनी शेतातील कामे आटोपती घेऊन दुपारनंतर मतदान केले.
केंद्रप्रमुखाच्या मोबाईलवर डल्ला
पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील हे आई, पत्नी व सासूसह सकाळी अकरा वाजता शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल केंद्रावर मतदानासाठी आले. ते मतदान करीत असताना खोलीमध्ये गर्दी झाली. त्याचा फायदा उठवीत अज्ञाताने टेबलावर ठेवलेला केंद्रप्रमुखांचा मोबाईल काही क्षणांतच गायब केला.
दोन तास रांगेत
उचगाव येथे कन्या व कुमार विद्यामंदिर या केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा शाळेबाहेर मैदानात आल्या होत्या. मतदान केंद्रातील दोन खोल्यांत ज्येष्ठ नागरिकांकडून ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्यानंतर ते अडकून बसत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू राहिली. मतदार रांगेत उभारल्यानंतर ते सुमारे दोन तासांनी मतदान करून बाहेर येत होते.

Web Title: The enthusiasm of 'south', the ranks of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.