‘यंग ब्रिगेड’चा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:13 AM2019-04-24T01:13:45+5:302019-04-24T01:13:50+5:30
कोल्हापूर : देशाच्या विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या स्त्रीशक्तीने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासून महिलांच्या लागलेल्या रांगा ...
कोल्हापूर : देशाच्या विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या स्त्रीशक्तीने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासून महिलांच्या लागलेल्या रांगा आणि त्यांच्या उत्साहाने या लोकशाहीच्या उत्सवात महिलांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले; तर नवमतदार युवक-युवतींपासून ते अनेक निवडणुका पाहिलेल्या वयस्कर आजींपर्यंत सर्वांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पडले.
पूर्वी महिला मतदानात फारशा सहभागी होत नसत; पण गेल्या काही वर्षांत करण्यात आलेली जागृती आणि आपल्या मताला असलेले महत्त्व यांची जाणीव झाल्याने महिलांचा मतदानाचा टक्का वाढला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सगळ्या मतदान केंद्रांवर गर्दी असली तरी घरातील सकाळची कामे आटोपल्यानंतर महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यानंतर केंद्रांवर महिलांच्या रांगा दिसू लागल्या. भागा-भागांतील महिला एकत्रितरीत्या जवळच्या केंद्रावर जात होत्या. केंद्र लांब असेल तेथे रिक्षाने तसेच दुचाकी, चारचाकी गाड्यांतून महिला येत होत्या. शिवाजी पेठ, बी. टी. कॉलेज, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक मतदान केंद्रावर महिलांच्या स्वतंत्र रांगा होत्या. अगदी सर्वसामान्य स्त्रीपासून ते उच्चभ्रू महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे या लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदविला.
जे पहिल्यांदाच मतदानाचे कर्तव्य पार पाडणार होते, अशा नवमतदारांमध्ये विशेष उत्साह आणि औत्सुक्य होते. आपल्याही मताला आता महत्त्व आहे, याबद्दलचा आनंद निळी शाई आपल्या बोटावर लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी चार वाजेपर्यंत केंद्रांवर महिलांची गर्दी नव्हती. बी. टी. कॉलेज येथे महिलांची रांग पुरुषांपेक्षा जास्त होती.
सेल्फी आणि सोशल अपडेट
पहिल्या मतदानाचे समाधान युवक-युवतींच्या चेहºयावर दिसत होते. मतदान केंद्राबाहेर आल्यानंतरच बोटाला लागलेली शाई दाखवत अनेकांनी सेल्फी काढून फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावर शेअर केले.
पाळणाघरापासून अनभिज्ञ
मतदारांना अधिक सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले असले तरी या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. मतदान केंद्रांवर बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. ते माहीत नसल्याने महिला बालकांसह रांगेत उभ्या होत्या.
व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर
दोन्हीकडे काटाजोड लढती असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब चांगले मतदान होण्यात पडले.
इव्हीएम मशिनबद्दल विरोधी पक्षांनी देशभरातून तक्रारी झाल्यावर निवडणूक आयोगाने या मतदान प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास वाढावा म्हणून या निवडणूकीत प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रायल) यंत्राचा वापर करण्यात आला. मतदारांने ईव्हीएम मशीनवर आपल्या मतांचा हक्क बजावला की पुढच्या पाच सेकंदात आपण कुणाला मत दिले आहे ते व्हीव्हीपॅटवर दिसत होते.
एवढे मतदान का झाले..?
लोकांतील राजकीय जागरूकता, चांगल्या कामाला भरभरून प्रतिसाद देण्याची सामूहिक मानसिकता, मतदानाची व्यवस्था उत्तम, तणावविरहित वातावरण, मतदान वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रबोधन आणि सोशल मीडियावरील आवाहन याचा एकत्रित परिणाम म्हणून मतदानाचा टक्का वाढला.
स्ट्राँगरूम परिसरात कडक बंदोबस्त
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार केलेल्या स्ट्रॉँग रूम (सुरक्षा कक्ष) परिसरात मंगळवारी रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथील स्ट्रॉँग रूम व हातकणंगले मतदारसंघाची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथील स्ट्रॉँगरूम येथे सुरूहोती.