संपूर्ण शुल्क माफी झालीच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:50+5:302021-06-29T04:17:50+5:30
कोल्हापूर : शैक्षणिक शुल्क (फी) माफी, शिष्यवृत्ती अदा करणे आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने (एआयएसएफ) कोल्हापुरातील बिंदू ...
कोल्हापूर : शैक्षणिक शुल्क (फी) माफी, शिष्यवृत्ती अदा करणे आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने (एआयएसएफ) कोल्हापुरातील बिंदू चौकात सोमवारी निदर्शने करण्यात आली. फेडरेशनने या मागण्यांचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना ई-मेलद्वारे पाठविले.
राज्यातील शाळा, व्यावसायिक, गैरव्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ७० टक्के शुल्क माफ करण्याचे आदेश राज्य सरकारने काढावेत, उर्वरित ३० टक्के शुल्क ही शासनाने महाविद्यालयांना अनुदान म्हणून द्यावी. राज्यातील दि. २४ मार्चपासून विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली संपूर्ण शुल्क विद्यार्थ्यांना तत्काळ परत करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ करावे. शैक्षणिक कर्ज वाटपात २५ टक्के वाढ देण्याचे आदेश बँकांना द्यावेत. सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत सर्व शिष्यवृत्ती योजनांची मदत विद्यार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा, आदी मागण्यांसाठी ‘एआयएसएफ’कडून आंदोलन करण्यात आले. ‘संपूर्ण फी माफी झालीच पाहिजे’, ‘शिष्यवृत्ती त्वरित मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनात प्रशांत आंबी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, विशाल चौगुले आदी सहभागी झाले. या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रशांत आंबी यांनी सांगितले.
फोटो (२८०६२०२१-कोल-एआयएसएफ आंदोलन) : शैक्षणिक शुल्क माफी, शिष्यवृत्ती अदा करणे, आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने (एआयएसएफ) कोल्हापुरातील बिंदू चौकात सोमवारी निदर्शने करण्यात आली.