रणरागिणी ताराराणींचा समग्र इतिहास येणार समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:18+5:302021-02-13T04:23:18+5:30
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लवकरच वाचकांना ...
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लवकरच वाचकांना उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले हे चरित्र मराठीतील समग्र असे पहिले चरित्र ठरणार आहे.
डॉ. पवार यांनी ४० वर्षांपूर्वी ताराराणी यांचे चरित्र लिहिले होते. परंतु त्यामध्ये १७०७ पर्यंतच्या घटनांचा आढावा घेण्यात आला होता. ऐतिहासिक साधनांच्या अभावामुळे त्यामध्ये फार विस्तार करता आला नव्हता. परंतु गेल्या ४० वर्षांत उजेडात आलेल्या अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे पुन्हा एकदा ताराराणी यांचे समग्र आणि संशोधनात्मक चरित्र लिहिण्याचा संकल्प डॉ. पवार यांनी सोडला होता.
दोन खंडांमध्ये हा ग्रंथ प्रकाशित होणार असून, यामध्ये ताराराणी यांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर ताराराणी यांच्या मृत्यूपर्यंत अशा दोन भागांचा समावेश आहे. औरंगजेबाच्या अखबाराचे जे संशोधन सेतुमाधवराव पगडी यांनी केले होते, त्याचा भक्कम आधार या चरित्राला आहे. त्यामुळे ताराराणी यांच्या प्रचंड कर्तबगारीचे पुरावेच ठायी ठायी सापडले आहेत.
औरंगजेबाचे जे तीन चरित्रकार आहेत, ते तिघेही ताराराणी यांच्या प्रचंड पराक्रमाने प्रभावित झालेले होते. ही एक विलक्षण स्त्री आहे. एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत. मराठ्यांच्या लष्करी मोहिमांचे संयोजन त्या करतात, असे स्पष्ट उल्लेख या चरित्रकारांनी करून ठेवले आहेत. सध्या या ग्रंथाचे मुद्रण सुरू असून, येत्या दोन महिन्यांत हा ग्रंथ वाचकांसाठी तयार होईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
चौकट
छत्रपती परिवाराकडून साडेसात लाखांचा निधी
ताराराणी यांचे समग्र चरित्र सिध्द व्हावे, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती परिवाराकडून साडेसात लाख रुपयांचा निधी या ग्रंथ निर्मितीसाठी देण्यात आला आहे. याचा धनादेश गुरुवारी डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कोट
महाराणी ताराराणी यांनी केवळ राज्यकारभार केला नाही, तर त्या लष्करी मोहिमांचेही संयोजन करत होत्या. जेव्हा औरंगजेबाची सेना करवीर प्रांतात झगडत होती, तेव्हा ताराराणी यांच्या २५/३० हजाराच्या फौजा गुजरात, मावळ, कर्नाटक प्रांतामध्ये धुमाकूळ घालत होत्या. ही त्यांची वैविध्यपूर्ण कर्तबगारी अस्सल ऐतिहासिक साधनांच्या आधारे या दोन खंडांमधून मांडण्यात येणार आहे.
डाॅ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक