युतीच्या धोरणाने साखर कारखानदारी उद्ध्वस्त
By admin | Published: January 28, 2015 11:25 PM2015-01-28T23:25:58+5:302015-01-29T00:07:54+5:30
हसन मुश्रीफ : राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्ता बैठक
कोल्हापूर : साखरेच्या दराबाबत ठोस धोरण नाही, साखर कारखान्यांना मदतीसाठी नुसते झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्यांवर कारवाई करायचे धोरण, राज्यातील युती व केंद्रातील भाजप सरकारचे आहे. त्यामुळे संपूर्ण सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त होणार असल्याची टीका राज्याचे माजी जलसंपदामंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी आज, बुधवारी केली. पुणे येथे ७ व ८ फेबु्रवारीला होणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. राज्य व केंद्रातील सरकार सर्व बाजूंनी निष्फळ ठरले आहे. त्याविरोधात जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकरी, कामगार यांच्या विरोधात काम सुरू केले आहे. याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून युती सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश करण्याची तयारी ठेवा. साखर कारखानदारीबाबत सरकारचे धोरण एकदम चुकीचे आहे. सहकार मोडीत निघाला, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, याचे भान सरकारला नाही. केवळ उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने लावला असून, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी महात्मा गांधी यांचे विचार व शांतीचा संदेश संपूर्ण जगाला आदर्श असल्याचे सांगितले, पण ज्यांनी गांधीजींचा खून केला त्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण भाजप सरकार करत आहे, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून सरकारला घेरा, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.
पुणे येथील मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, आगामी काळात केंद्र सरकारच्या सामान्य माणसांच्या विरोधातील धोरणांबाबत आपली भूमिका मांडावी लागणार असल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्थायी सभापती आदिल फरास यांनी आभार मानले. महापौर तृप्ती माळवी, माजी आमदार नामदेवराव भोईटे, माजी महापौर कादंबरी कवाळे, गटनेता राजू लाटकर, मधुकर जांभळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविकात पुणे येथील मेळावा, त्यासाठीच्या नियोजनाचा आढावा घेतला.