उद्योजक अतुल कोरगांवकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:04 PM2018-09-18T19:04:42+5:302018-09-18T19:10:19+5:30
कोल्हापूरातील उद्योजक अतुल अनंतराव कोरगांवकर (वय ६३) यांचे निधन झाले. कै. अनंतराव कोरगांवकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र, तर उद्योजक अमोल कोरगांवकर यांचे वडील बंधु होत
कोल्हापूर : कोल्हापूरातील उद्योजक अतुल अनंतराव कोरगांवकर (वय ६३) यांचे निधन झाले. कै. अनंतराव कोरगांवकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र, तर उद्योजक अमोल कोरगांवकर यांचे वडील बंधु होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अनिकेत, मुलगी आज्ञा, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
अतुल कोरगांवकर हे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी मितभाषी, हसतमुख आणि प्रत्येकाला मदतीचा हात देण्यात तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित होते. विशेष म्हणजे कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आतापर्यंत येवून गेलेले आॅर्केस्ट्रा, विविध मान्यवर गायकांचे गायनाचे कार्यक्रम, आदी कार्यक्रमात हमखास एक जाणकार श्रोता म्हणून ते हजर असत. नवोदीत गायकांना ते नेहमी प्रोत्साहीत करीत होते. यासह त्यांना क्रिकेटमध्ये अधिक रस होता.
न्यू हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना त्यांना क्रिकेटमध्ये चुणुक दाखविली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्सच्या संघातूनही त्यांनी महाविद्यालयीन व क्लब क्रिकेट गाजविले. अत्यंत साधी राहणीमान, विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते.यासह कोरगांवकर उद्योग समुहाच्या पेट्रोल वितरण संस्थेत त्यांचा मोलाचा वाटा होता. गेले काही दिवस ते मुत्रपिंडाच्या विकाराने ते त्रस्त होते.
मंगळवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी त्यांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर मान्यवर व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज, बुधवारी सकाळी रक्षाविसर्जन आहे.