उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: आत्महत्या की घातपात?, फाॅरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची दुसऱ्यांदा तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:49 PM2023-06-29T12:49:42+5:302023-06-29T12:50:04+5:30
तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर पथक माघारी परतले
गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे तिहेरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलिस कोठडीतील ‘त्या’ माजी नगरसेविकेसह सपोनि राहुलकुमार राऊत यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये विष प्राशन करून व गळे चिरून घेऊन आत्महत्या केली. ‘ती’ माजी नगरसेविका आणि राऊत यांनी संगनमताने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून १ कोटीची खंडणी मागून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद असल्यामुळे त्या नगरसेविकेसह राऊतविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबचे डॉ. सनी खंदारे यांच्या नेतृत्वाखालील चौघांच्या पथकाने येथील गांधीनगरातील शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक गजानन सरगर, शीतल शिसाळ आदी उपस्थित होते.
तब्बल दोन तास चौकशी
शिंदे यांच्या त्या बेडरूमला दोन दरवाजे व एक खिडकी आहे. खिडकीला जाळी मारण्यात आली असून बेडरूममध्ये जाण्यासाठी हॉलमध्ये जिन्याची सोय आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:हून आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे ? यासंदर्भात माहिती घेण्यासाठी फॉरेन्सिकचे पथक आले होते. घटनास्थळाच्या तपासणीनंतर तपासी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर पथक माघारी परतले.