उद्योजक सुनील जनवाडकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:51+5:302021-05-13T04:24:51+5:30
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध उद्योजक व व्हर्सटाईल ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ सुनील विठ्ठल जनवाडकर (वय ६६) यांचे ...
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध उद्योजक व व्हर्सटाईल ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ सुनील विठ्ठल जनवाडकर (वय ६६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ‘मैत्रीला जागणारा माणूस’ अशी त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कन्येचा विवाह झाला आहे. त्यामुळे कुटुंब आनंदात असताना हा आधार निखळला.
विठ्ठल जनवाडकर यांनी बागल चौकामध्ये छोट्याशा स्वरूपात उद्योगक्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरू केला. सुनील यांनी मोठ्या स्वरुपात १९८० साली एमआयडीसी येथे व्हर्सटाईल इंजिनिअर्सची स्थापना केली. व्यवसायातील दूरदृष्टी ठेवून त्यांनी कास्ट आर्यन फौंड्री सुरू केली. त्यानंतर १९८७ साली प्रभा इंजिनिअर्स ही मशीन शाॅप सुरू केली. नवनवीन बदल करत उद्योग विस्तार केला. सन २०१० साली व्हर्सटाईल आलुकास्ट प्रा. ही ॲल्युमिनियम फाैंड्री आणि मशीन शाॅपची उभारणी केली. जागतिक बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी व ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी २०१८ ला बेळगाव येथे व्हर्सटाईल इंडस्ट्रीज या कास्ट आर्यन फौंड्रीची निर्मिती केली. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत त्यांनी प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला. त्यानंतर २०२१ मध्ये होनगा बेळगाव येथे व्हर्सटाईल इंडस्ट्रीजच्या दुसऱ्या युनिटची स्थापना केली. सर्व उद्योग विस्तारात व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या पत्नी बीना व व्हर्सटाईलचे कार्यकारी संचालक मुलगा यतीन यांनी मोलाची साथ दिली. व्हर्सटाईल सोशल ॲन्ड कल्चरल फाऊंडेशनच्या माध्यामातून त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली. महापालिका, बालकल्याण संकुल, सीपीआर, मातोश्री वृद्धाश्रम, करूणालय अशा अनेक संस्थाना भरीव मदत केली. काही लाखांचा व्यवसाय कोटीत नेला. दोन हजार कामगारांच्या हाताला रोजगार दिला. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राची कधी न भरून येणारी हानी झाली.
फोटो : १२०५२०२१-कोल-सुनील जनवाडकर (निधन)