उद्यमशील, अहिंसाप्रिय जैन समाज

By Admin | Published: May 25, 2015 12:16 AM2015-05-25T00:16:21+5:302015-05-25T00:26:04+5:30

विविध क्षेत्रांत आघाडीवर : शेती, उद्योगाच्या जडणघडणीत मौलाचे योगदान--जैन समाज--लोकमतसंगे जाणून घेऊ

Entrepreneurial, non-violent Jain society | उद्यमशील, अहिंसाप्रिय जैन समाज

उद्यमशील, अहिंसाप्रिय जैन समाज

googlenewsNext

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -प्राचीन काळापासून शहर आणि जिल्ह्यात जैन समाज सर्वांगीण विकासात आघाडीवर राहिला आहे. विविध क्षेत्रांत समाजाने चमकदार कामगिरी केली आहे. शेती, उद्योग, व्यापारातून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे. शहराच्या जडणघडणीत समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे. संपूर्ण भारतीय उपखंडात जैन समाज विखुरलेला आहे. सर्वसाधारणपणे राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल येथे मोठ्या प्रमाणात जैन समाज आहे. जैन समाजात दिगंबर व श्वेतांबर असे दोन प्रमुख पंथ आहेत. याशिवाय ८४ पोटजाती आहेत. अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, सम्यक ज्ञान, चारित्र्य, ब्रह्मचर्य ही जैन समाजाची तत्त्वे आहेत. पुरोगामी, समतावादी, सर्वसमावेशक अशी या समाजाची ओळख आहे. जातीयता, कर्मठपणा, पशूहत्या, अज्ञान, अंधश्रद्धा यांच्याविरोधात समाज कायम आहे.
दिगंबर चतुर्थ शेतीमध्ये अग्रेसर, तर पंचम व हुम्मड व्यापारात आघाडीवर आहेत. जैन समाजातील अनेक लोकांनी वित्तीय, बांधकाम, कारखानदारी, बँकिंग, सहकार, व्यापार क्षेत्रांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसाधारणपणे कष्टाळू, शिस्तबद्ध, काटकसरी, कल्पक, अहिंसक, बचतीला प्राधान्य देणारा, आरोग्याचे महत्त्व जाणणारा असे समाजाचे अंगभूत गुण आहेत.
समाजाला एकत्रित आणि प्रगतीसाठी ३ एप्रिल १८९९ रोजी निपाणीनजीकच्या स्तवनिधी (जि. बेळगाव) येथे दक्षिण महाराष्ट्र जैन सभेची स्थापना करण्यात आली. यासाठी दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांनी पुढाकार घेतला. कालांतराने त्याचे ‘दक्षिण भारत जैन सभा’ असे नामांतर करून कोल्हापूरसह सांगली, बेळगाव, हुबळी असे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले. सभेचे दर तीन वर्षांनी अधिवेशन होते. त्यामध्ये समाजांतर्गत विविध विषय, कर्तृत्ववानांचा सत्कार, पुढील वाटचाल यावर चर्चा होते.
राजर्षी शाहू महाराजांनी तीन एकर जागा दिल्याने १९०५ मध्ये दसरा चौक परिसरात दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना झाली. माणिकचंद जव्हेरी यांनी बोर्डिंगच्या इमारतीसाठी आर्थिक हातभार लावला. अण्णासाहेब लठ्ठे यांनी पहिले अधीक्षक म्हणून काम केले. समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे अत्यल्प फीमध्ये निवासाची सोय केली जाते. सध्या या बोर्डिंगमध्ये २२० विद्यार्थी आहेत. विद्यार्थी घडविण्यात बोर्डिंगचा मोठा वाटा आहे. समाजातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणसाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळे आजअखेर १ कोटी ३७ लाखांचा फंड जमा असून त्यातून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
जिल्ह्यातील जैन बोर्डिंग व श्री क्षेत्र बाहुबली येथे स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान भूमिगत स्वातंत्र्यसैनिक लपून बसत. अनेकवेळा भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांची गुप्त खलबतेही येथे चालत. फक्त जैनच नव्हे तर जैनेत्तर स्वातंत्र्यसैनिकांनाही येथे सन्मानाने त्याकाळी आसरा दिला असाही बोर्डिंगचा इतिहास आहे.


समाजातील स्वातंत्र्यसैनिक
दादासाहेब मगदूम मास्तर, दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे, वर्धमाने वकील, भाऊसाहेब मगदूम, बापूसाहेब पाटील (कोल्हापूर), तात्यासाहेब देसाई (उदगाव), बाबासाहेब खंजिरे (इचलकरंजी), अ‍ॅड. आप्पासाहेब मगदूम (कागल), शाम पाटील (चिंचवाड, ता. करवीर), बी. जे. पाटील (किणीकर), भीमराव मगदूम (कसबा सांगाव), सातप्पा टोपण्णावर (कडवी- शिवापूर, मुरगूड), भरमू चौगुले, श्रीपाल चौगुले (अर्जुनवाड), जिन्नाप्पा खोत (रुकडी), विद्यानंद महाराज (दीक्षेपूर्वी सुरेंद्र उपाध्ये).


क्रीडा क्षेत्र कामगिरी केलेले महत्त्वाचे ‘हिरे’
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (इचलकरंजी, राष्ट्रीय कबड्डी संघात सहभाग)
महावीर खवाटे ( शिरटी ,
ता. शिरोळ, राष्ट्रीय कबड्डीपटू)
एन. एन. पाटील (किणी, ता. हातकणंगले, राष्ट्रीय कबड्डीपटू)
देवेंद्र बिरनाळे (इचलकरंजी, राष्ट्रीय कबड्डीपटू)
कुबेर अण्णासाहेब पाटील (किणी, खो-खो, अ‍ॅथलेटिकचे माजी पंच
राहुल पाटील (किणी, राष्ट्रीय कबड्डीपट्टू)
डॉ. चेतन मगदूम (कोल्हापूर, राज्यपातळीवर सी. के. नायडू ट्रॉफीत सहभाग)
सचिन उपाध्ये (कोल्हापूर, क्रिकेट राज्य पातळीवर गोवा संघात निवड)


लोकसंख्या...
कोल्हापूर शहर - २० हजार
जिल्हा - सव्वा लाखापेक्षा जास्त


जैन श्राविकाश्रम
समाजातील मुलींसाठी लक्ष्मीपुरी येथे जैन श्राविकाश्रम आहे. या वसतिगृहात इंटरनेट सुविधेसह विविध सेवा दिल्या जातात. चेअरमन कांचन भिवटे, व्हा. चेअरमन प्रा. छाया जर्दे, सचिव वनिता पाटील, सह. सचिव मंगल पाटील हे पदाधिकारी याचे काम पाहतात.


राजकारणावर ‘ठसा’
माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी या राजकीय नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा निर्माण केला. राजकारणासह सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकासाला मदत केली.


पदाधिकारी..
दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष रावसाहेब अण्णासाहेब पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. डी. ए. पाटील, चेअरमन सागर चौगुले, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे.

Web Title: Entrepreneurial, non-violent Jain society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.