कराड येथील धरणे आंदोलनात उद्योजक सहभागी
By admin | Published: June 25, 2014 01:13 AM2014-06-25T01:13:22+5:302014-06-25T01:13:41+5:30
कोल्हापुरातील टोलला विरोध
कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाला तसेच आकारल्या जात असलेल्या टोलला विरोध म्हणून गुरुवारी कराड येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनात कोल्हापुरातील उद्योजकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज कृती समितीच्या काही सदस्यांनी उद्योजकांच्या काही संघटनांशी भेटी देऊन आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी जिल्ह्यात सुरू आहे. आज कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, रमेश मोरे, भाऊ घोगवे, प्रकाश केसरकर यांनी इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, हुपरी चांदी असोसिएशन, हुपरी बुलियन असोसिएशन, चांदी असोसिएशन, गांधीनगर सिंधी पंचायत आदी संघटनांशी बैठक घेऊन गुरुवारच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्वत:चे वाहन घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी साळोखे यांनी केले. त्यावेळी उद्योजकांनी आंदोलनात सहभागी होत असल्याची ग्वाही दिली.