उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील

By admin | Published: December 22, 2016 01:10 AM2016-12-22T01:10:44+5:302016-12-22T01:10:44+5:30

प्रदीप पेशकार : भाजप उद्योग आघाडीतर्फे चर्चासत्र; उद्योजकांनी मांडले प्रश्न

Entrepreneurs' questions will start | उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील

उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील

Next

कोल्हापूर : उद्योग क्षेत्राकडे आश्वासक विकासाला पूरक क्षेत्र म्हणून पाहिले गेले आहे. त्यामधील अडचणी समजून घेण्यासाठी भाजपने रचना केली आहे. दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न समजून घेणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी बुधवारी रात्री येथे केले.
ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लब येथे भाजप उद्योग आघाडीतर्फे उद्योजकांच्या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यामध्ये श्रीधर व्यवहारे, उद्योजक चंद्रकांत जाधव, मोहन घाटगे, प्रकाश मालाडकर, विश्वजित कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रदीप पेशकार यांनी उद्योजकांकडून समस्या व त्यावरील पर्याय जाणून घेतले. चंद्रकांत जाधव यांनी उद्योजकाला ताकद दिली पाहिजे. यासाठी अशी चर्चासत्रे राज्यभरात घेतली जावे, अशी मागणी केली.
प्रकाश मालाडकर यांनी भाजप उद्योग आघाडीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. उद्योजक संजय पाटील यांनी उद्योगक्षेत्राला वीजदर कमी करावा, असे सांगून समस्या सोडविण्यासाठी पर्याय देतो; परंतु ते पूर्ण करण्याची तारीख जाहीर करावी, असे सांगितले. उद्योजक शामसुंदर मर्दा यांनी इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला मदत करावी, तसेच कोल्हापुरात ईएसआय रुग्णालय व्हावे, असे सांगितले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक प्रकाश चरणे यांनी औद्योगिक वसाहतींमधील मालमत्तेला लागलेला बी टेन्युअर रद्द करावा, असे सांगितले.
‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील यांनी जिल्ह्णातील सर्व लहान-मोठ्या उद्योगांना लागणारे परवाने व मंजुऱ्या स्थानिक पातळीवर मिळाव्यात, मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश करावा, अशी मागणी केली.
‘गोशिमा’चे संचालक संग्राम पाटील यांनी बंद विमानसेवा पुन्हा सुरू करावी, शिवाजी विद्यापीठ येथे एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शनल सेंटर सुरू करावे, असे सांगितले. ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी यांनी ‘आयटीआय’साठी असोसिएशनला जागा व अनुदान मिळावे; औद्योगिक वसाहतींमध्ये एफएसआय वाढवून द्या, व इंडस्ट्रियल वेस्टसाठी जागा द्या, असे सांगितले. ‘गोशिमा’चे अध्यक्ष जे. आर. मोटवाणी यांनी उद्योग विस्तारासाठी जागा देण्याची तर राज्य उद्योग मित्र बैठक कोल्हापुरात घ्यावी; किमान वेतन समितीवर उद्योजक प्रतिनिधी घेण्याची सूचना श्रीकांत दुधाणे यांनी मांडल्या.



भविष्य निर्वाह निधीच्या अधिकाऱ्यांची मोगलाई
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांना मोगलाईप्रमाणे त्रास द्यायला सुरुवात केली आहे. ते मनमानी पद्धतीने उद्योजकांना वेठीस धरत आहेत. पोटतिडकीने नरेंद्र मोदी यांना मतदान करून प्रस्थापितांना आम्ही घरात बसविले; परंतु तेच दिवस परत आले आहेत का, असे यानिमित्ताने वाटू लागल्याची खंत उद्योजक उदय दुधाणे यांनी व्यक्त केली.
भाजपने देणगी कॅशलेस स्वीकारून सुरुवात करावी
सर्व राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपर्यंतची निनावी देणगी स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. या देणग्या सर्व राजकीय पक्षांनी कॅशलेस स्वीकाराव्यात व त्याची सुरुवात भाजपने करून चांगला संदेश द्यावा, अशी सूचना उद्योजक कुशल सामंत यांनी मांडली.

Web Title: Entrepreneurs' questions will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.