कोरोनाचा अटकाव करण्यात उद्योजक, कामगारांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:08+5:302020-12-08T04:21:08+5:30
शिरोली : उद्योजक आणि कामगार यांनी कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, स्वतःची काळजी, स्वसंरक्षण केल्यामुळेच कोरोनाचा अटकाव करण्यात यश आले ...
शिरोली : उद्योजक आणि कामगार यांनी कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, स्वतःची काळजी, स्वसंरक्षण केल्यामुळेच कोरोनाचा अटकाव करण्यात यश आले आहे. यामुळे गेली आठ, नऊ महिने चांगल्याप्रकारे उद्योग सुरू आहेत.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील उद्योजक स्वत:ची आणि कामगारांची काळजी घेेेत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीच्या गेटवरच थर्मामीटर,ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. सर्व तपासणी करूनच उद्योजक व कामगार कंपनीत प्रवेश करतात. तसेच मास्क सक्तीचा आहे. मास्क नसेल तर प्रवेश दिला जात नाही.
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा भारतात प्रवेश झाला. भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून २३ मार्च ते १ मे असा चाळीस दिवस संपूर्ण देशात पूर्णतः लाॅकडाऊन केले. १ मे नंतर कोल्हापूरमधील उद्योग सुरू झाले. ट्रान्सपोर्ट, दळणवळणही हळूहळू सुरू झाले.
मे, जून, जुलै महिन्यांत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली. त्यानंतर मात्र रुग्ण संख्या कमी होत गेली. या संपूर्ण आठ, नऊ महिन्यांच्या काळात उद्योजकांनी आणि कामगारांनी स्वतःची काळजी घेत उद्योग चांगल्याप्रकारे चालवले आहेत.
कंपनीच्या गेटवरच थर्मामीटरने प्रत्येक कामगाराचे तापमान, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासली जाते आणि सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर यामुळे उद्योजक आणि कामगार सुरक्षित राहिले आहेत.
चौकट :
उद्योजक आणि उद्योग संस्थांची मदत
कोरोना काळात चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॅक, गोशिमा, मॅक, कोल्हापूर इंजिनिअरिंग या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दानशूरता दाखवत कामगारांना लाॅकडाऊन काळात मदत केली. मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर देऊन प्रशासनाला सहकार्य केले आहे.
प्रतिक्रिया
मे महिन्यात उद्योग सुरू झाल्यावर स्मॅक, गोशिमा, चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग, मॅक या सर्व औद्योगिक संघटना आणि उद्योजक यांनी बैठक घेऊन नियोजन करून कोरोनाचा अटकाव करण्यात यश मिळविले.
(स्मॅक अध्यक्ष - अतुल पाटील)
प्रत्येक कंपनीने प्रवेशद्वारावरच थर्मामीटर,ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची सोय केली. प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच कंपनीत प्रवेश, काम करताना सोशल डिस्टन्सिंग, प्रत्येकाने मास्कचा वापर केला. त्यामुळे कोरोनाचा अटकाव झाला.(उद्योजक-सुरेश चौगुले)
कोरोना काळात शासनाने आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटींचे काटेकोर पालन कामगार आणि उद्योजक दोघांनीही केले. त्यामुळे कोरोनाचा अटकाव झाला.
(जनरल सेक्रेटरी जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन-गिरीष फोंडे)