कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:38+5:302021-04-10T04:23:38+5:30

कोल्हापूर : बिहार ते विदर्भासह मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन या हंगामातील पहिल्या मान्सून पूर्व ...

Entry of pre-monsoon rains in Kolhapur | कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री

कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री

Next

कोल्हापूर : बिहार ते विदर्भासह मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन या हंगामातील पहिल्या मान्सून पूर्व पावसाने कोल्हापुरात एन्ट्री केली आहे. गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी तर शुक्रवारी सकाळी हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या धरणीने थोडा गारवा अनुभवला. दिवसभर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम राहिले. आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसाचा सामना करावा लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

साधारपणे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात होते; पण यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आगमन झाले आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाने एकदम उसळी घेत ४० अंशाचा पारा गाठला होता. मार्चमधील सर्वसाधारण तापमानापेक्षा हेे ५ ते ६ अंश सेल्सिअसने जास्त होते. अचानक वाढलेल्या या तापमानाने गेली पंधरा दिवस काहिली वाढवली. बुधवारी व गुरुवारी सकाळी जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा हलकासा शिडकावाही झाला. शुक्रवारी सकाळी सातपासूनच पावसाचा शिडकावा सुरू झाला. तासभर भुरभुर सुरू राहिल्याने काहीसा गारवा तयार झाला; पण त्यानंतर सूर्यदर्शन झाले नसले तरी हवेतील उष्म्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. दिवसभर असाच उष्मा कायम राहिला. पारा ३९ अंशापर्यंत स्थिर राहिला. आज शनिवारी दिवसभर हीच परिस्थिती राहणार आहे.

चौकट ०१

शेतकऱ्यांची धांदल

वाळलेल्या वैरणी शेतातून गोळा करून त्या गंजी करून ठेवण्याची घाई सुरू झाली आहे. सध्या शाळू काढणी सुरू आहे, कणसे पावसात भिजल्यास ज्वारी काळी पडणार असल्याने ज्वारी उत्पादक धास्तावले आहेत.

चौकट ०२

वाळवणीच्या कामात व्यत्यय

ग्रामीण भागात वर्षभराच्या बेगमीचे जळण, शेणी रचून ठेवण्यासाठी महिलांची कसरत सुरू आहे. घराघरात सध्या सांडगे पापड करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे या कामाच्या नियोजनात बदल करावा लागला आहे.

चौकट ०

वेलवर्गीय पिके वाचवण्यासाठी लगबग

अचानक बदलेले वातावरण वेलवर्गीय पिकांसाठी धोकादायक असल्याने शेतकऱ्यांनी लगेच शेतीसेवा केंद्र गाठले. सध्या काकडी, दोडका, कलिंगडाचा हंगाम जोरात सुरू आहे. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका या पिकांना बसतो. फूलगळ, फळ कुज होऊ नये म्हणून फवारणीसाठीची औषधे घेण्यासाठी गर्दी झाली आहे.

फोटो ०९०४२०२१-कोल-वातावरण

फोटो ओळ: कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. शुक्रवारी सकाळी पावसाचा शिडकावा झाला, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शहरातील त्रिकोणी बागेत प्रिन्स शिवाजी पुतळ्यावळ टिपलेले, हे छायाचित्र.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Entry of pre-monsoon rains in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.