Kolhapur- 'पुनर्वसन' कार्यालयात प्रवेशाचा लष्करी फतवा, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठीच फक्त दोनच तास
By भीमगोंड देसाई | Published: July 7, 2023 04:51 PM2023-07-07T16:51:25+5:302023-07-07T16:51:50+5:30
कार्यालयात थेट लोकांनी जाऊ नये, यासाठी टेबल आडवे लावून वाट अडवली
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील जिल्हा पुनर्वसन कार्यालयात लोकांना प्रवेशबंदी केली आहे. पुनर्वसनच्या नूतन उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांनी हा फतवा काढला आहे. सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत मलाच भेटायचे, कार्यालयात जायचे नाही, असा त्यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात थेट लोकांनी जाऊ नये, यासाठी टेबल आडवे लावून वाट अडवली आहे.
पुनर्वसन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असतो. येथील काम पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. परिणामी या कार्यालयाचे कामकाज वादग्रस्त ठरले आहे. दरम्यान, येथे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणून महिन्यापूर्वी लष्करे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांनी आठ दिवसांपूर्वी कार्यालयात सरसकट सर्वांनी येण्यास मज्जाव केला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी कार्यालयात प्रवेशद्वारातच दोन टेबले आडवी लावून तिथे एका लिपिकाला बसवले आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब, सर्वसामान्य, शेतकरी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामाच्या चौकशीसाठी कार्यालयात येत आहेत. मात्र त्यांना प्रवेशद्वारातच लिपिक रोखतो. तो लिपिक मॅडमना भेटा, अशी सूचना देतो. मॅडम कधी भेटणार अशी विचारणा केल्यावर सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असे सांगण्यात येते. आम्हाला त्या वेळेत बसने येणे आणि जाणे शक्य नाही, असे लोक सांगतात; तरीही लिपिक प्रवेश देत नाही. नाराज होऊन लोक मॅडमच्या भेटीची प्रतीक्षा करीत बाकड्यावर बसून राहतात. काही लोक लिपिकाशी भांडण काढत आहेत. वादावादी करीत आहेत. जनतेसाठी असलेल्या कार्यालयात अशा प्रकारे प्रवेशबंदी करून मुस्कटदाबी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
वेळ गैरसोयीची
आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, आदी कोल्हापूरपासून लांब तालुक्यांतील गावातून बसने पुनर्वसन कार्यालयात येण्यास दुपारी एक किंवा दोन वाजतात. यामुळे ते पुनर्वसन अधिकाऱ्यांना सकाळी ११ ते १२ या वेळेत भेटू शकत नाहीत. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भेटल्यास गावी जाण्यास रात्र होते. काही मार्गांवर बसेसही मिळत नाहीत; यामुळे सकाळी आणि संध्याकाळची ही अभ्यागत भेटीची वेळ गैरसोयीची आणि त्रासदायक ठरत आहे.
विसंगत कारण
टेबल लावून कार्यालयातील रस्ता अडवलेला लिपिक ‘न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे. त्यामुळे कार्यालयात जाता येणार नाही,’ असे सांगतो. अधिकारी मात्र कार्यालयात गर्दी होते; यामुळे निश्चित केलेल्या वेळी मलाच भेटायचे असे सांगत आहेत. कार्यालयातील प्रवेशबंदीच्या कारणामध्येही विसंगती असल्याचे जाणवते.
जिल्हाधिकाऱ्यांचे दार उघडे, पुनर्वसनचे बंद
जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कधीही भेटता येते. यांच्या कक्षाचा दरवाजा नेहमी उडा असतो. याउलट पुनर्वसन कार्यालयातील प्रवेशच बंद केल्याने तलावासाठी घर, शेत दिलेल्यांची एकप्रकारे हेटाळणीच सुरू असल्याचाही आरोप होत आहे.
हेलपाटे यासाठी...
धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे, पुनर्वसनाचा दाखला देणे, पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीविषयक प्रमाणपत्र देणे, धरणग्रस्तांसाठी कल्याणकारी योजना राबविणे, भूसंपादन प्रस्तावांना अभिप्राय देणे.
लोक कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना भेटल्याने गर्दी होते. त्यातून कामात अडथळा येतो. त्यामुळे मला सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास भेटावे. इतर वेळी लोकांना भेटण्यास बंदी केली आहे. काम गतीने व्हावे यासाठीच तसे केले आहे. - सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, कोल्हापूर
पुनर्वसनाचा दाखल्यासाठी तीन वेळा आलो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या त्रुटी काढल्या आहेत. आज आलो आहे. पण मला कार्यालयात प्रवेश नाकारला आहे. - प्रकल्पग्रस्त, करंबळी, ता. गडहिंग्लज.