Environment Day Special : पर्यावरणात मानवी हस्तक्षेप नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:44 PM2020-06-05T13:44:55+5:302020-06-05T14:12:50+5:30
2000 ते 2020 या काळात जिल्ह्यातील पर्यावरणाचे आम्ही काय बरे-वाईट केले त्याचा हा आढावा... कोल्हापूर हा पश्चिम घाटातील विपुल जैवविविधतेचा भाग आहे. नद्या, अभयारण्य, वनस्पती, पशुपक्षी यांची विविधता येथे मोठी आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांत कोल्हापूरचा परिसर पर्यावरणदृष्ट्या कमकुवत बनत चालला आहे, तो वाचवण्याची गरज आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सह्याद्रीचा भाग असलेल्या पश्चिम घाटात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे, हे खरे तर आपले भाग्य आहे. विपुल जैवविविधता ही निसर्गाची देणगी असलेल्या या जिल्ह्यातील पर्यावरणाचा हळूहळू ऱ्हास होत आहे, हे लक्षात घेता, हे आपले जीवन समृद्ध करणारे पर्यावरण वाचविण्याची गरज आहे. पर्यावरणवादी प्रयत्नांना सामान्य माणसांची जोड मिळेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समृद्धसंपन्न होऊ हे संचारबंदीच्या काळात मानवी हस्तक्षेप नसल्याने नितळ आणि स्वच्छ निसर्गाने आपल्याला दाखवून दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यांतच जैवविविधता आहे, असे नाही. त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोन, चोरटी वृक्षतोड, बेकायदा शिकार आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नव्या दोन अभयारण्यांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या 20 वर्षांचा आढावा घेतला तर तापमानातील वाढ ही ३५ अंश सेल्सिअसवरुन ४0 अंशांपर्यंत वाढली आहे, याचे कारण जागतिक हवामान बदल, माणसांसाठीच्या सुविधा, रस्तेविकासासाठी झालेली वृक्षतोड, कमी झालेले वृक्षआच्छादन आहे.
पावसाचा लहरीपणाही गेल्या 20 वर्षांत वाढला आहे. पावसाचे प्रमाण जरी कमी-अधिक असले तरी त्यात नियमितता नाही. महिन्याचा पाऊस आता चार दिवसांतच पडतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा होण्याची क्षमता कमी झाली आहे.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यांमुळे प्रदूषण वाढले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण कमी झालेले आढळले. त्यामुळे मानवी हस्तक्षेप, अतिक्रमण यांमुळे प्रदूषण वाढल्याचे सिद्ध होते. औद्योगिकीकरण आणि वाहनांची वाढलेली अमाप संख्या यांमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामुळेच ध्वनीचेही प्रदूषण वाढले आहे. हे लक्षात येते.
सन 2000 ची स्थिती
1. पर्जन्यमान नियमित होते. पावसाचा लहरीपणा नव्हता. संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामात सरासरीने पाऊस पडत होता.
2. महामार्गावर वृक्षराजी दाट होती. त्यामुळे वृक्षआच्छादन होते. रस्त्याकडेला सावलीचे प्रमाण अधिक होते.
3. कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय द्वीपकल्पात आढळणाऱ्या १८00 पैकी ७00 एंडेमिक वनस्पतींच्या प्रजातींची नोंद झाली.
4. कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३0 ते ३५ अंश सेल्सिअस इतके होते. हवा, वायू, ध्वनी आणि जलप्रदूषणाचे प्रमाण कमी होते.
5. जंगलक्षेत्राचे प्रमाण मोठे होते. राधानगरी आणि दाजीपूर हे गवा अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले.
सध्याची स्थिती
1. मानवी हस्तक्षेपामुळे पर्जन्यमान अनियमित झालेले आहे. महिन्याचा पाऊस आता चार दिवसांतच पडतो आहे.
2. विविध रस्तेप्रकल्पांमुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झाली. त्या तुलनेत झाडे लावली गेली नाहीत.
3. नोंदवलेल्या ७00 वनस्पतींच्या प्रजातींपैकी आता १३५ प्रजाती संकटग्रस्त, तर ९ प्रजाती अतिसंकटग्रस्त किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
4. विविध विकास प्रकल्प, वृक्षतोड, उद्योग, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे प्रदूषण वाढलेले आहे. यामुळे तापमान ४0 अंशांवर पोहोचले.
5. जंगलक्षेत्र घटले आहे. अभयारण्याची अधिकृत अंतिम अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही.
बदलते वातावरण, मानवी हस्तक्षेप, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पर्यावरणात गेल्या 20 वर्षांत मोठा हानिकारक बदल झाला आहे. ही स्थिती बदलायची असेल तर आपणच आपल्यावर लॉकडाऊनचा कालावधी तयार करण्याची गरज आहे. पर्यावरणाची हानी वाचली तरच मानवाची हानी होणार नाही.
- डॉ. मधुकर बाचुळकर
गेल्या 20 वर्षांत पर्यावरणात मोठा बदल झाला आहे, याला कारण माणूस आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणवादी व्यक्ती आणि संस्थांमुळे यात सकारात्मक बदल होतो आहे. आंदोलनामुळे पर्यावरण राखले जाऊ लागले आहे. याला सामूहिक बळ मिळाले पाहिजे.
- उदय गायकवाड.