पर्यावरणाच्या आड येणाऱ्या राक्षसांना गाडा
By Admin | Published: November 30, 2015 09:49 PM2015-11-30T21:49:46+5:302015-12-01T00:14:58+5:30
आबासाहेब मोरे : संवर्धनासाठी पेढे येथे पश्चिम घाट जंगलपेर अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ
चिपळूण : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल सध्या बिघडू लागला आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची खरी गरज आहे. पूर्वी कंस, रावण असे काही मोजकेच राक्षस समाजात होते. त्यांचा नाश करणे त्या त्या वेळी सोयीचे ठरले. परंतु, आता पर्यावरणाच्या आड येणारे असंख्य राक्षस निर्माण झाले आहेत. या राक्षसांना सर्वसामान्य माणसांनी गाडून झाडे लावली पाहिजेत, ही सामुदायिक जबाबदारी आहे. त्याची सुरुवात आज परशुराम भूमीतून होत आहे याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्र, कोकण एक्स्प्रेस फाऊंडेशन व पेढे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी रविवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता आर. सी. काळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पश्चिम घाट जंगलपेर अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी आमदार रमेश कदम, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पिपल्स हेल्पलाईनचे अॅड. कारभारी गवळी, पंचायत समिती सदस्य व संस्थेचे अध्यक्ष अभय सहस्त्रबुध्दे, अश्विनी भट, उल्का कुरणे, प्रमोद काकडे, सरपंच दीपक मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष डी. एस. मोहिते, पोलीसपाटील वैष्णवी पानकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर. सी. काळे विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी माजी आमदार कदम, सभापती मेस्त्री, उपविभागीय अधिकारी हजारे व मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रभातफेरीने सर्वजण मोरेवाडी येथील डोंगरात गेले. तेथे बिगर मोसमी बियांची पेरणी करुन जंगलपेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सतीश कदम यांनी केले सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
हरित चळवळ : बिगर मोसमी पेरणी
1पर्यावरण रक्षणासाठी पेढे येथे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभातफेरीतून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मोरेवाडी डोंगरावर बिगर मोसमी पेरणी करण्यात आली.
2या कार्यक्रमाची सुरूवात उंबर वृक्ष पूजनाने करण्यात आली. यावेळी निसर्ग संशोधक माधव गाडगीळ यांना ‘ग्रीन मार्शल आॅफ वेस्टर्न घाट’ हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार उल्का कुर्ने, आश्विनी भट यांनी स्वीकारला.
3‘गांधीजी अगेन्स्ट ग्लोबल वार्मिंग’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हरित चळवळीला बळकटी देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच अनुशंगाने हे अभियान पेढे येथे राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांना शपथ
पेढे येथे जंगलपेर अभियानाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी रॅली काढण्यात आली.