महापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:43 AM2019-08-19T11:43:21+5:302019-08-19T11:46:32+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट ...
कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिका, असोसिएशन आॅफ अर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर यांच्याद्वारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यात बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी झूम प्रकल्पात येणाऱ्या नव्या कचऱ्यावर केली जात आहे.
पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेला कचरा मोठ्या प्रमाणात झूम प्रकल्पामध्ये येत आहे. साधारणत: रोज एक टन कचरा या प्रकल्पामध्ये टाकण्यात येत आहे. त्यात कापसाच्या गाद्या, धान्य, कपडे, कागदी बॉक्स, फर्निचर, आदींचा समावेश आहे.
हा कचरा कुजणे सुरू झाले आहे. त्यातून लिंचेट बाहेर पडत असल्याने या कचऱ्यांच्या दुर्गंधीची तीव्रता अधिक आहे. ही दुर्गंधी कमी करणे तातडीने गरजेचे होते. फॉगिंग मशीन, अन्य रसायने यांच्या वापरावर मर्यादा होत्या; त्यामुळे या कचऱ्यांची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सने पाऊल टाकले आहे. बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी अग्निशमन दलाच्या चार टँकरद्वारे या कचऱ्यांवर केली जात आहे; त्यामुळे कचऱ्यांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे.
कम्पोस्ट खतामध्ये रूपांतर
बायोसॅनिटेशन आणि कल्चर यांच्या फवारणीमुळे महापुरातील कचऱ्याची दुर्गंधी साधारणत: ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. या फवारणीमुळे संंबंधित कचऱ्यातील विषारी वायू शोषले जाते आणि आॅक्सिजन हवेत सोडला जातो. या कचऱ्यांचे विघटन होऊन दोन महिन्यांत त्याचे कम्पोस्ट खत तयार होते. पर्यावरणपूरक पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
झूम प्रकल्पातील कचऱ्यावर गुरुवारपासून फवारणी करण्यात येत आहे. महापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे काम सुरू आहे; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत झाली असल्याचे असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.
महापुरामुळे निर्माण झालेला कचरा झूम प्रकल्प येण्याचे कमी होईपर्यंत संबंधित फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी या प्रक्रियेचा उपयोग केला जाणार असल्याचे कोराणे यांनी सांगितले.
लिंचेट बाहेर पडून दुर्गंधी
महापुराच्या पाण्यातील सर्व कचरा भिजलेला आहे. शिवाय तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; त्यामुळे त्यातून लिंचेट बाहेर पडून दुर्गंधी सुटलेली आहे; त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ते टाळण्यासाठी संबंधित फवारणी करण्यात येत आहे.