शिरोळमध्ये साथीचे आजार

By admin | Published: December 25, 2015 11:04 PM2015-12-25T23:04:30+5:302015-12-25T23:54:52+5:30

चिकुनगुन्या- सदृश रुग्ण -साथ आटोक्यात न आल्यास रुग्णालयास टाळे

The epicenter in Shirol | शिरोळमध्ये साथीचे आजार

शिरोळमध्ये साथीचे आजार

Next

शिरोळ : शहरात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे़ आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच चिकुनगुन्यासदृश साथीचे ३00 रुग्ण आढळून आले. साथीच्या आजाराबाबत ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य आधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ही साथ आटोक्यात न आल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शहरातील बाजारपेठ भागात ब्राह्मणपुरी, गावडे गल्ली, पार्वती चौक यांसह अन्य भागांत चिकुनगुन्यासदृश आजाराचे रुग्ण आहेत़ दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली असून, थंडी वाजून येणे, अंगदुखी, गुडघेदुखी, सूज येणे, शरीर आखडणे, अशी लक्षणे चिकुनगुन्यासदृश रुग्णांमध्ये आढळून येत आहेत़
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एम़ बी़ कुंभोजकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ पी़ एस़ दातार यांची भेट घेऊन शहाजी गावडे, धनाजी चुडमुंगे, प्रकाश माने, पोपट गावडे, शिवाजी संकपाळ, दादासाहेब देशमुख यांच्या शिष्टमंडळाने तक्रारी केल्या़ ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते़ शिवाय दवाखान्याचे कामकाज बंद पाडून प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी येथील बाजारपेठ भागात दरगोबा मंदिर येथे बुधवारपासून तात्पुरते आरोग्य उपचार व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे़ या ठिकाणी रुग्णांची तपासणी व उपचार करून औषधे दिली जात आहेत. १५ आॅक्टोबरपासून शिरोळ गावात या साथीचे थैमान सुरू झाले असून १ महिन्यानंतर आरोग्य विभागाने दखल घेऊन तात्पुरती उपचार सेवा सुरू केली़ मात्र, सांडपाणी निचरा, परिसर स्वच्छता यांसह आवश्यक बाबींकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी़ आरोग्य विभागाने चिकुनगुन्याची
साथ एका महिन्यात आटोक्यात आणावी, अन्यथा शिरोळ ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सचिन शिंदे व प्रकाश गावडे यांनी दिला. आजाराबाबत दरगोबा मंदिरमधील आरोग्य केंद्राशी संपर्क साधून नागरिकांनी उपचार घ्यावेत,असेही आवाहन त्यांनी केले आहे़

२७ जानेवारीला टाळे ठोकणार
चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या शिरोळमध्ये नागरिकांची आरोग्यदृष्ट्या अडचण लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण रुग्णालय स्थापन केले आहे. मात्र, येथे रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी हे दोन जबाबदार अधिकारी नेमले आहेत़; परंतु रुग्णालयाचे अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच चिकुनगुन्यासदृश साथीचे ३०० रुग्ण आहेत़
येत्या महिन्याभरात ही साथ आटोक्यात न आल्यास शिरोळ रुग्णालयास २७ जानेवारीला टाळे ठोकले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सचिन शिंदे व पै़ प्रकाश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला़


सर्वेक्षण सुरू
साथीचे १५ रुग्ण आढळून आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़ घालवाड, जयसिंगपूर, नांदणी, सैनिक टाकळी, दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्र व शिरोळ उपकेंद्रातील कर्मचारी अशा २४ कर्मचाऱ्यांना पाचारण करून शिरोळमध्ये प्रभागनिहाय स्वच्छता, पाणी वापर, वाहत्या गटारी, आजारी कुटुंबांविषयी माहिती घेण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

Web Title: The epicenter in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.