सेवा रुग्णालय, प्राथमिक, नागरी आरोग्य केंद्रात साथीच्या आजारांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:05+5:302021-06-30T04:16:05+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात रोज डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. त्याची चाचणी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय, प्राथमिक, ...
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात रोज डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. त्याची चाचणी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय, प्राथमिक, नागरी आरोग्य केंद्रात होते. पण कोरोनाचे कारण सांगून रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करण्याचे टाळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी सरकारी आरोग्य यंत्रणेकडून चाचणीस नकार दिल्याने संबंधित रुग्णास खासगी प्रयोगशाळेमध्ये जावे लागत आहे. परिणामी यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैशाची लूट केली जात आहे.
अलीकडे कोरोनासह डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजारांचे रुग्ण सापडत आहेत. उचगाव, कळंबा, इचलकरंजी, कागल, पुलाची शिरोली तर शहरातील सदर बझार, टेंबलाईवाडी, जागृतीनगर अशा ठिकाणी डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. यामुळे वारंवार ताप येणे, अंगदुखी होणे, सांधेदुखी अशी लक्षणे असणारे डेंग्यू, चिकुनगुनियाची चाचणी करून घेत आहेत. याच्या चाचणीसाठी कुठे जावे, यासंबंधी सामान्य, गरीब रुग्णास पुरेशा प्रमाणात माहिती नसते. काही सरकारी रुग्णालयात यासंबंधीची चाचणी होत असनातानाही दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात असल्याचेही समोर आले आहे. अशा प्रकारामुळे त्या रुग्णास खासगी प्रगोगशाळेत नाइलाजाने जावे लागते. तिथे त्यांच्याकडून ७५० ते एक हजार रुपयांपर्यंत फी वसूल केले जाते. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले असताना शासकीय दवाखान्यात होणाऱ्या चाचणीसाठी गरिबांना इतके पैसे बाहेर मोजावे लागत आहेत. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आहे; पण यातूनही साथीच्या आजारांच्या चाचणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
चौकट
जागृतीवेळी चाचणी
कोठे हेही सांगावे
जिल्हा हिवताप विभाग, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, महापालिका आरोग्य प्रशासनातर्फे डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजारांसंबंधी जनजागृती केली जात आहे. जागृतीवेळी लक्षणे असल्यास सरकारी दवाखान्यात कोठे चाचणी करून घ्यावी, यासंबंधीही व्यापक जागृती करण्याची गरज ठळक झाली आहे.
चौकट
विसंगत माहिती
सीपीआरच्या शेंडा पार्कमधील प्रयोगशाळा प्रमुख डॉ. नीता जंगले यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सीपीआरमधील २१७ नंबरच्या खोलीत डेंग्यू, चिकुनगुनियाची नमुने घेतली जात असल्याचे सांगितले. मात्र, याउलट माहिती अधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. यामुळे सीपीआरमध्ये सध्या साथीच्या आजारांची चाचणी होते की नाही, याबद्दल सामान्य रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोट
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजारांची चाचणी होते. यामुळे या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तेथे जाऊन नमुने देऊन तपासणी करून घ्यावी.
अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
सीपीआर रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे सध्या डेंग्यू, चिकुनगुनियाची चाचणी सीपीआरमध्ये केली जात नाही. याची चाचणी सेवा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालयात होते.
एस. एस. मोरे, अधिष्ठाता