अटीतटीच्या दोन्ही लढती बरोबरीत : चारही संघांना प्रत्येकी एक गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:20 AM2019-12-25T00:20:14+5:302019-12-25T00:21:26+5:30
कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील ...
कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील सामना १-१ असा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. या सर्व चारही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी प्रॅक्टिस ‘अ’ व तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांच्या आघाडीवीरांकडून सुरुवातीपासूनच आक्रमक व वेगवान चाली झाल्या. यात दहाव्या मिनिटाला ‘प्रॅक्टिस’कडून ओंकार मोरे याने गोलक्षेत्राच्या बाहेरून मारलेल्या फटक्यात चेंडूने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला. त्यामुळे आपसूकच संघास १-० अशी आघाडी मिळाली. ती फार काळ टिकली नाही. बाराव्या मिनिटास ‘दिलबहार’कडून जावेद जमादारने मैदानी गोलची नोंद करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले. उत्तरार्धात ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, इमॅन्युएल, इंद्रजित चौगुले, राहुल पाटील, ओंकार मोरे, आकाश माळी यांनी आघाडी घेण्यासाठी चढाया केल्या; तर दिलबहारकडून अॅबिओ, शुभम माळी, राहुल तळेकर, जावेद जमादार, रोमॅरिक यांनीही तितक्याच जोरदारपणे चढाया करीत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत यश आले नाही. परिणामी हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
पाटाकडील ‘ब’ व उत्तरेश्वर प्रासादिक यांच्यात झालेला सामनाही २-२ असा बरोबरीत राहिला. सामन्यांच्या पूर्वार्धात उत्तरेश्वरच्या ओंकार खोपकर याने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ४९ व्या मिनिटाला सिद्धेश यादव याने गोल करीत संघाची ही आघाडी २-० अशी वाढविली. दोन गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पाटाकडील ‘ब’कडून आघाडी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. यात ६३ व्या मिनिटाला वैभव देसाई याने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली.
त्यानंतर ८५ व्या मिनिटास आशिष घाटगे याने गोल करीत संघास २-२ असे बरोबरीत आणले. ‘पाटाकडील’कडून सार्थक राऊत, साईराज पाटील, संग्राम शिंदे, यश देवणे; तर उत्तरेश्वरकडून श्लोक साठम, ओंकार कोपकर, अक्षय मंडलिक, अजिंक्य शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला. अखेरीस हा सामना २-२ असा बरोबरीत राहिला.