पोर्ले सरपंच पदासाठी महिलांना समान संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:16+5:302021-03-07T04:22:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणेतील ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सहा महिलांना सरपंच पदाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणेतील ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सहा महिलांना सरपंच पदाची समान संधी देऊन राजकीय सारिपाटवर महाविकास आघाडीने नवा अध्याय घालून दिला आहे. ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. इतर प्रवर्गातील महिलांना कारभारी पदाची संधी देण्याचा गटनेत्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाची लाॅटरी लागल्यावर स्पर्धेत नसलेल्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक पातळीवर सरपंच पदाचा फाॅर्म्युला ठरवूनच सरपंच-उपसरपंच पदांच्या निवडी झाल्या. रोटेशन पद्धतीच्या सरपंच आरक्षण निवडीच्या मुद्दयावर बऱ्याच खलबती अनुभवयास मिळतात. कारण आपल्या वाट्याला आलेले आरक्षण दुसऱ्याला देण्याचे धाडस कोणी करत नाही. सलग पाच वर्ष नव्हे तर कित्येक वर्ष सरपंच पद भूषविले तरी कारभारी होण्याची इच्छा काही सुटत नाही.
पोर्ले ग्रामपंचायतीत सहा महिलांसह १३ जागा जिंकून महाविकास आघाडीने सत्ता मिळवली.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित जाहीर झाले. त्यामुळे आघाडीतून सदस्यपदाच्या बेरजेसाठी नशीब आजमावणाऱ्या खुल्या प्रवर्गातील चार महिलांसाठी सरपंच पदाची लाॅटरी लागली. उर्वरित नागरिकाचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती अशा इतर दोन प्रवर्गातील महिलांसाठी कारभारी पदाची महत्त्वाकांक्षा स्वप्न होते; परंतु आघाडीने सर्वसमावेशक निर्णय घेत सत्ता मिळविली होती. त्याच नीतीचा अवलंब करत गटनेत्यांनी ग्रामपंचायतीच्या इतिहासात सर्व प्रवर्गातील सहा महिलांना समान संधी देऊन राजकीय सामाजिक सलोखा साधला आहे.
चौकट
बहुतांशी महिला बोलतच नाहीत.... राजकारणात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा कमी-अधिक प्रमाणात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे; परंतु खूप कमी महिला पदाचा प्रत्यक्ष वापर करतात. बहुतांश महिला पदासाठी नामधारी असतात. पत्नीला पदाधिकार आणि पतीदेव किंवा गटनेते कारभाऱ्याची भूमिका बजावत असताना निर्णयात ढवळाढवळ करतात. त्यामुळे बहुतांशी महिला न बोलताच पदभार पाहत असतात. अशीच स्थिती बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात अनुभवास मिळत आहे.
यांना मिळणार कारभारीपण सर्वसाधारण महिला - गीता चौगुले, नम्रता घाटगे, वनिता भोपळे, अनुराधा पाटील, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला रजनी गुरव, अनुसूचित जाती महिला छाया कांबळे.
विनंती :- बातमीत जागतिक महिला दिनाचा सिंबाॅल वापरा