कोरोना लस साठवणुकीची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:00+5:302020-12-25T04:19:00+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड -१९ लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी व ...
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड -१९ लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी व खासगी मिळून एकूण ९,४५४ इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली असून, लस साठवणुकीची पुरेशी कोल्ड स्टोअरेज उपकरणे उपलब्ध असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सांगितले.
टास्क फाेर्स समितीच्या सदस्यांची गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. बैठकीत कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने नियोजनाचे स्लाईड शो द्वारे डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले.
लसीकरण तीन ते चार टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी व खासगी आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यांची माहिती कोविड पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लस देण्याकरिता नियोजनबद्ध कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना प्रशासक बलकवडे यांनी आरोग्य अधिकारी पोळ यांना दिल्या.
दि. १७ जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगानेे लसीकरण अधिकारी डॉ. रूपाली यादव यांनी स्लाईड शो द्वारे पल्स पोलिओ मोहिमेच्या नियोजनाबाबत सादरीकरण केले.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक आयुक्त संदीप घारगे, वैद्यकीय संघटना प्रतिनिधी डॉ. गीता पिल्लई, स्त्रीरोग संघटना अध्यक्ष डॉ. मंजूषा पिशवीकर, राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक अभय जायभाय, सैना सब अत्ताफ, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावड, रोटरी प्रतिनिधी डॉ. आर. एस. पाटील, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ. शिरीष पाटील व डॉ. अरुण मुधाळे, प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे, डॉ. विजय मुसळे उपस्थित होते.
फोटो क्रमांक -२४१२२०२०-कोल-केएमसी मीटिंग
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेत गुरुवारी कोरोना लसीकरणासंदर्भात स्थापन झालेल्या टास्क फाेर्सची बैठक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत पार पडली.