इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी स्वभांडवल हीच मोठी अडचण, राज्यात 'इतक्या' कारखान्यांकडे प्रकल्प 

By विश्वास पाटील | Published: August 8, 2023 03:21 PM2023-08-08T15:21:55+5:302023-08-08T15:22:35+5:30

साखरेला फाटा देऊन इथेनॉलचा पर्याय

Equity capital is the biggest hurdle for setting up ethanol projects, Project at 122 factories in the state | इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी स्वभांडवल हीच मोठी अडचण, राज्यात 'इतक्या' कारखान्यांकडे प्रकल्प 

इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी स्वभांडवल हीच मोठी अडचण, राज्यात 'इतक्या' कारखान्यांकडे प्रकल्प 

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारणी करण्यात स्वभांडवलाची उभारणी हीच सगळ्यात मोठी अडचण असल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या दोनशेपैकी १२२ कारखान्यांकडे इथेनॉल उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्राची २२६ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची क्षमता राज्याने २४४ कोटीपर्यंत वाढवली आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनांकडे वळले पाहिजे, असा आग्रह धरला. इथेनॉलमुळे कारखानदारीला मोठा आर्थिक आधार मिळतो, हे खरे असले तरी सरसकट सर्वच कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनांकडे वळण्यातही अडचणी आहेत. ज्या कारखान्यांनी आता हे प्रकल्प सुरू केलेले नाहीत, त्यातील बहुतांशी उणे नेटवर्थमधील आहेत. त्यांना सरकारने मदत करून प्रकल्प सुरू करायचा म्हटले तरी स्वभांडवलासाठी १० टक्के रक्कम लागते. ती आणायची कोठून हा तिढा आहेच. क्षमतेनुसार प्रकल्पाची किंमत कमी जास्त होत असली तरी किमान शंभर कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करावी लागते.

कारखान्याचे गाळप संपल्यानंतर जेवढे मोलॅसिस उपलब्ध असेल त्यातून तीनशे दिवस प्रकल्प चालवता येणार नाही. तेवढ्या कमी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन सुरू केल्यावर मोलॅसिसचा तुटवडा भासू शकतो. त्यासाठी इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती हा पर्याय आहे. तांदूळ, मक्यापासून असे उत्पादन घेता येते. 

परंतु हे धान्य पुरवठ्यातील केंद्र शासनाचे धोरण फारच धरसोडीचे आहे. देशातील अन्नधान्याच्या टंचाईवर त्याचे निर्णय होतात. त्यामुळे पर्यायी धान्य न मिळाल्यास इथेनॉल उत्पादन करायचे कशातून हा प्रश्न आहे. केंद्र शासनाने तांदळापासून इथेनॉल करण्यावर नुकतेच निर्बंध घातले आहेत. मग त्यावर उपाय म्हणून देशाची गरज आहे तेवढ्याच साखरेचे उत्पादन करून ब्राझीलप्रमाणे बी हेवी मोलॅसिसचा वापर करून इथेनॉल करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. आता पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी आहे. हेच प्रमाण २०२५ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादन

प्रकल्प -संख्या - क्षमता (कोटी लिटर)

सहकारी - ४२ : ६४.९०
खासगी - ४२ : ९९.११
स्वतंत्र प्रकल्प - ३८ : ६१.८५
एकूण १२२ प्रकल्प : २२६

तीन वर्षातील मागणी-पुरवठा-(कोटी लिटरमध्ये)

साल : मागणी : पुरवठा : टक्केवारी
२०२०-२१ : १०८ : ९७ : ८९.८१
२०२१-२२ : १२० : १०२ : ८५.००
२०२२-२३ : १३२ : ८७.११ : ६५.९० (जूनअखेर)
 

Web Title: Equity capital is the biggest hurdle for setting up ethanol projects, Project at 122 factories in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.