उदगाव दरोड्यातील आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:59 AM2017-10-02T00:59:55+5:302017-10-02T00:59:55+5:30

The escape of the accused in the Udagaon Dock | उदगाव दरोड्यातील आरोपीचे पलायन

उदगाव दरोड्यातील आरोपीचे पलायन

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून, महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया आरोपीने आजाराचा बहाणा करीत सीपीआर रुग्णालयातून रविवारी पहाटे चारच्या सुमारास हातातील बेड्या काढून पलायन केले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २३, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. आरोपीने पलायन केल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात खळबळ माजली. सर्वत्र नाकाबंदी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्रीपर्यंत तो सापडला नाही.
उदगाव ते शिरोळ जाणाºया बायपास रस्त्यावर निकम मळा येथे शेतवडीत प्रा. प्रीतम बाबूराव निकम यांचा बंगला आहे. दि. १३ आॅगस्टला रात्री बंगल्यावर दरोडा पडला. यावेळी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी प्रीतम यांच्या आईवडिलांवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अरुणा निकम (५५) यांचा मृत्यू झाला; तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले होते. प्रा. प्रीतम निकम यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी संशयित विशाल पवार याच्यासह आकाश नामदेव पवार ऊर्फ जाबाज उपकाºया पवार, मैनेश झाजम्या पवार, शेळक्या जुरब्या पवार या चौघांना अटक करून जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. सात दिवसांच्या कोठडीनंतर या चौघांची बिंदू चौक कारागृहात रवानगी झाली.
चालता येत नसतानाही पलायन
यातील अन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार आहेत. त्यांनी पवारला पळून जाण्यामध्ये मदत केल्याची शक्यता आहे. लक्ष्मीपुरी पोलीस सीपीआर रुग्णालय, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकासह आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पवार याला सरळ चालता येत नाही, तो वाकून चालतो. तरीही त्याने पलायन केले.
तिघांचे आज निलंबन शक्य
बंदोबस्तास असणाºया पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दरोड्यातील आरोपीने पलायन केले. याप्रकरणी सहायक फौजदार दिनकर कवाळे, कॉन्स्टेबल सचिन वायदंडे व होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी या तिघांवर आज, सोमवारी निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. रविवारी सुटी असल्याने रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी आदेश निघाला नव्हता.
नातेवाइकांच्या घरावर छापे
दरोड्यातील आरोपींचे नातेवाईक कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), करमाळा (सोलापूर), इंदापूर (पुणे) या भागांत सक्रिय आहेत. त्यामुळे पवार या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता ओळखून जयसिंगपूर पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यांना सावध केले. येथील नातेवाइकांच्या घरासह तासगाव, वाळवा, मिरज, आदी ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून शोध घेतला.
पलायन नाट्यानंतर पोलिसांना बसला धक्का!
बिंदू चौक येथील कारागृहात असताना संशयित विशाल पवार याला मूळव्याधीचा त्रास होऊ लागल्याने दि. २८ सप्टेंबर रोजी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथील दूधगंगा इमारतीच्या तिसºया मजल्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दिनकर एस. कवाळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पी. वायदंडे, होमगार्ड ए. एस. सूर्यवंशी होते. वॉर्डमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याने शनिवारी (दि. ३०) रात्री संशयित पवार याला हाताची बेडी बेडला लावून झोपवून वायदंडे व सूर्यवंशी बाहेरील हॉलमध्ये झोपले. याच संधीचा फायदा घेत पवार याने पहाटे चारच्या सुमारास हातातील बेडी शिताफीने काढत पलायन केले. पहाटे सहाच्या सुमारास वायदंडे हे झोपेतून उठून वॉर्डात आले असता पवार बेडवर नव्हता. त्याने पलायन केल्याचे पाहून वायदंडेना धक्काच बसला. त्यांनी सहायक फौजदार कवाळे यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. तासाभरात कवाळे सीपीआर रुग्णालयात आले. या तिघांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला. शोध घेऊन थकल्यानंतर कवाळे यांनी नियंत्रण कक्षाला आरोपी पवारने पलायन केल्याची वर्दी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कराहून नाकाबंदीचे आदेश दिले. संपूर्ण शहरात नाकाबंदी केली; परंतु ठावठिकाणा लागला नाही.

Web Title: The escape of the accused in the Udagaon Dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.