कामगारांना ‘एम्स’च्या धर्तीवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:56 PM2022-08-04T12:56:32+5:302022-08-04T12:57:11+5:30

कोल्हापुरात साकारणार उपप्रादेशिक कार्यालय

ESIC Hospital will have all the latest medical facilities on the lines of AIIMS for the workers and their families | कामगारांना ‘एम्स’च्या धर्तीवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार

कामगारांना ‘एम्स’च्या धर्तीवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरातील ईएसआयसी हॉस्पिटलच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होणार आहे. त्यामुळे लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘एम्स’च्या धर्तीवर ‘एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा’ मिळणार आहेत, अशी माहिती खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी दिली.

या ईएसआयसी हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणाचे काम केंद्रीय लोक निर्माण विभागाने मार्च २०२१ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून दिल्लीतील ठेकेदारास डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याच्या अटीवर दिले होते. वेळोवेळी सूचना देऊनही या ठेकेदाराकडून काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने त्यांचा ठेका केंद्रीय लोक निर्माण विभागाने रद्द केला. या हॉस्पिटलच्या कामाबाबत मी केलेल्या विनंती पत्राची केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी तातडीने दखल घेतली.

त्यांनी या हॉस्पिटलच्या कामाची जलदपणे नव्याने निविदा प्रक्रिया राबवून सक्षम ठेकेदाराची नेमणूक केली. हॉस्पिटलच्या कामाबाबत बुधवारी दिल्ली येथे ईएसआयसीच्या राष्ट्रीय मुख्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात नवीन ठेकेदारांकडून मार्च २०२३ पर्यंत युद्धपातळीवर काम पूर्ण करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यात ईएसआयसीच्या पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढविण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचे ठरविण्यात आले.

महाराष्ट्रातील प्रलंबित वैद्यकीय विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकर योग्य उपाययोजना करणार असल्याचे ईएसआयसीचे डायरेक्टर जनरल मुखमित सिंग भाटिया यांनी सांगितले. यावेळी ईएसआयसीचे जोसेफ, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे, श्रम मंत्रालय व नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापुरात साकारणार उपप्रादेशिक कार्यालय

कोल्हापूर विभागात सध्या ईएसआयसी लाभार्थ्यांची संख्या दीड लाख आहे. ती लवकरच दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबियांची संख्या १० लाखांनी वाढणार असल्याने कोल्हापुरात ईएसआयसीचे उपप्रादेशिक कार्यालय साकारण्याचा प्रस्ताव खासदार मंडलिक यांनी ईएसआयसी मुख्यालयाला सादर केला आहे. त्यामुळे कामगार, आस्थापनांचे विविध आर्थिक, प्रशासकीय प्रस्तावांचे जलद निर्गतीकरण होणार असल्याचे विज्ञान मुंडे यांनी सांगितले.

Web Title: ESIC Hospital will have all the latest medical facilities on the lines of AIIMS for the workers and their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.