कोल्हापूरसह चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:37 AM2021-02-23T11:37:38+5:302021-02-23T11:41:47+5:30
Agriculture Sector kolhapur-कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमिनींपैकी तब्बल ३७.५ टक्के क्षेत्राचा म्हणजे ११६.१२ लाख हेक्टर एवढ्या मोठ्या जमिनीचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी हवामान विभागापैकी चार कृषी हवामान विभागांत विद्यापीठाचे क्षेत्र व्यापले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे विद्यापीठ प्रचंड विस्तार आणि भौगोलिक सलगतेअभावी आपल्या अधिपत्याखालील क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे.
या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली असून, पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांचाही पाठिंबा या कृषी विद्यापीठासाठी घेणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.
सांगोला, पंढरपूर विद्यापीठासाठी योग्य तालुके
चार जिल्ह्यांची सोय व उपलब्ध जागा पाहता, सांगोला किंवा पंढरपूर तालुके हे मध्यवर्ती असल्याने येथे स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास राहुरी विद्यापीठाचा थेट फायदा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना होऊ शकतो. येथे आदिवासींची संख्या अधिक असून, या भागात पारंपरिक शेती करणारा मोठा समुदाय आहे. नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून आधुनिक शेतीच्या प्रवाहात वेगाने आणता येईल, असेही कदम यांनी सरकारला पटवून दिले आहे.