मस्जिदी प्रबोधनाची केंद्रे व्हावीत--थेट संवाद

By admin | Published: January 7, 2015 08:59 PM2015-01-07T20:59:40+5:302015-01-08T00:02:42+5:30

मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हुसेन जमादार

To establish mosque insight centers - direct dialogue | मस्जिदी प्रबोधनाची केंद्रे व्हावीत--थेट संवाद

मस्जिदी प्रबोधनाची केंद्रे व्हावीत--थेट संवाद

Next

मुस्लिम समाजातील तलाक पद्धत, शिक्षण, कुटुंब नियोजन, युवक व महिलांचे कल्याण या प्रश्नांवर गेली पंचेचाळीस वर्षे मुस्लिम सत्यशोधक चळवळ काम करीत आहे़ कोल्हापूरचे सुपुत्र हुसेन जमादार यांनी या चळवळीसाठी विशेष योगदान देत मुस्लिम समाजातील तलाक प्रथेविरोधी दीर्घ लढा दिला आहे़ या कार्याची दखल घेत मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी जमादार यांची निवड करण्यात आली़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जमादार यांच्याशी संवाद साधला़ यावेळी मस्जिदी ही समाज प्रबोधनाची केंद्रे व्हावीत, या मस्जिदीमधील कार्यक्रम सर्वांसाठी खुले करावेत; त्यामुळे इतर धर्मीयांचा मस्जिदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असे रोखठोक मत मांडत जमादार यांनी मुस्लिम समाजाच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला़

प्रश्न : मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या कार्याचे स्वरूप ?
उत्तर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची फाळणी झाली़ फाळणीनंतर येथील २० टक्के मुस्लिमच पाकिस्तानमध्ये गेले़ उर्वरित ‘मेरा देश, मेरी मिट्टी’ या भावनेतूनच इथेच राहिले़; पण स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य मुस्लिम या देशाच्या मुख्य प्रवाहात आले नाहीत़ शिक्षण, नोकरी, राहणीमान या सर्वच बाबतीत बहुसंख्य मुस्लिमांची अवस्था दयनीय झाली़ मुस्लिम स्त्रियांना तलाकसारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते़ या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधनाची चळवळ म्हणून हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली़
प्रश्न : मुस्लिम समाजाची प्रमुख सामाजिक समस्या कोणती ?
उत्तर : मुस्लिम स्त्रियांना पतीकडून मिळणारा ‘तलाक’ आणि शिक्षणाचा अभाव या प्रमुख समस्या मुस्लिम समाजाला भेडसावतात़ ‘शरियत’ने स्त्रियांवर अनेक बंधने लादलेली आहेत़ तलाकमुळे स्त्रीला गुलामीचे जीवन जगावे लागते़ शरियतनुसार मुस्लिम पती तलाक म्हणून त्याच्या पत्नीला घटस्फ ोट देतो़ लग्नापूर्वी तिची संमती घेतली जाते; पण तलाक घेताना मात्र तिची संमती घेतली जात नाही़ मुस्लिम पुरुष चार विवाह करू शकतो़ पतीच्या या कृतीला कोणतेही कायदेशीर बंधन नाही़ यामुळे मुस्लिम स्त्रियांचे जीवन असुरक्षित होते़ शिवाय कुटुंबनियोजनाची समस्याही उद्भवते़ मुस्लिम महिलांची तलाकमधून सुटका करण्यासाठी समान नागरी कायदा अस्तित्वात येणे आवश्यक आहे़ यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे़ ़
प्रश्न : तलाक समस्येसाठी आपल्या चळवळीचे योगदान?
उत्तर : आम्ही १९८५ मध्ये कोल्हापूर नागपूर तलाकमुक्ती मोर्चा काढला़ तोंडी तलाक कायद्याने रद्द व्हावा, अशी मागणी सरकारकडे केली़ तसेच पन्नास तलाकपीडित महिलांना घेऊन दिल्ली येथेही मोर्चा काढला़ १९७२ मध्ये पहिली मुस्लिम महिला परिषद पुणे येथे घेतली़ इस्लामच्या इतिहासात महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित केलेली जगातील ही पहिली परिषद ठरली़ तलाक दिलेल्या महिलांसाठी मोफ त कायदा सल्ला, तसेच रोजगार केंद्रे सुरू केली़ १९८७ साली आॅल इंडिया प्रोगे्रसिव्ह मुस्लिम कॉन्फ रन्स कोल्हापूर येथे आयोजित केली़ या परिषदेतून देशभरात १० ते १२ मुस्लिम महिला संघटना उदयास आल्या़ महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण झाली़
प्रश्न : मुस्लिम आरक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे ?
उत्तर : भारतामधील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी सुमारे ८० टक्के मुस्लिम हे धर्मांतरित आहेत़ यांपैकी बहुतांश मुस्लिम बांधवांचे पोट हातावर आहे़ साहजिकच दारिद्र्य, आरोग्य आणि निकृष्ट राहणीमान, आदी समस्या हे समाजापुढील मोठे आव्हान आहे़ त्यामुळे नोकरी आणि शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे़ मुस्लिम समाज नोकरीच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षणातील आरक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे़
प्रश्न : मुस्लिम युवावर्गाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?
उत्तर : मुस्लिम समाजातील युवक-युवतींनी समाजप्रबोधनाच्या लढाईत सहभागी होणे आवश्यक आहे़ मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शन शिबिरांत सहभाग घेऊन समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठविला पाहिजे़ इस्लामी देशांच्या तुलनेत भारत, बांग्लादेश हा स्वातंत्र्यपूर्व भारताचाच भाग असल्यामुळे इथे सुधारणांचे वारे वेगाने वाहू शकते़ सुधारणांच्या या लढाईत तरुणांनी स्वत:ला झोकून दिले पाहिजे़
- संदीप खवळे

Web Title: To establish mosque insight centers - direct dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.