कोल्हापूर जिल्ह्यात नव्या १६ नागरी आरोग्य केंद्रांची स्थापना, तालुक्याला होणार 'या' चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 01:51 PM2021-12-22T13:51:19+5:302021-12-22T13:56:54+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पातळ्यांवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्याला ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पातळ्यांवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्याला १५ व्या वित्त आयोगातून येणाऱ्या पाच वर्षांत १३५० कोटी रुपये मिळणार असून, त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात १६ नागरी आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, तर तालुका पातळीवर अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व शासकीय आरोग्य संस्था बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ पर्यंत या सर्व ठिकाणी सुधारणा करण्यात येणार असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांची निवड करण्यात आली आहे.
युध्दपातळीवर हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून आज, बुधवारीच आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असणाऱ्या उपअभियंत्यांची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी सुमारे २५ कोटींहून अधिकचा निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
सहा तालुक्यांत अद्ययावत प्रयोगशाळा
पहिल्या टप्प्यात आजरा, चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांत अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कोरोना, चिकुनगुन्या, डेंग्यू, मलेरियासह अन्य सर्व आरोग्य चाचण्या होणार आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसाठी २५०० चौरस फुटाचे कार्यालय आणि प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून तंत्रज्ञासह एकूण चौघा कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांच्या आवारात हे कार्यालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये संगणकासह अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापुरात दोन पॉलिक्लिनिक
याच निधीतून कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या फिरंगाई आणि राजारामपुरी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्वसाधारण तपासण्या आणि उपचारांबरोबरच अन्य विशेष आरोग्य सेवाही देण्यात येणार आहेत.
नगरपालिकांच्या ठिकाणी वेलनेस सेंटर
जिल्ह्यात नगरपालिकांच्या ठिकाणी लोकसंख्येनुसार नागरी आरोग्य केंद्रांची म्हणजेच हेल्थ वेलनेस सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. इचलकरंजी येथे २, कुरूंदवाड २, जयसिंगपूर २, पेठवडगाव २, गडहिंग्लज २, मलकापूर १, कागल १, पन्हाळा १ या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहरात ‘सावित्रीबाई फुले’सह आणखी एका ठिकाणी अशा दोन ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.