‘पंतप्रधान रोजगार निर्मिती’तून कोल्हापूर जिल्ह्यातील २५३ महिलांकडून उद्योग उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 03:29 PM2021-12-11T15:29:18+5:302021-12-11T15:46:02+5:30
या योजने अंतर्गत महिलांना सेवा उद्योग व्यवसायासाठी दहा लाख, तर उद्योगासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यात शहरी भागातील महिलांना दहा, तर ग्रामीण भागामधील महिलांना ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान (सबसिडी) दिले जाते.
संतोष मिठारी
कोल्हापूर : स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे, कौशल्याला उद्योग-व्यवसायाची जोड देणे, घरकाम झाल्यानंतर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे आदी उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील २५३ महिलांनी गेल्या तीन वर्षांत उद्योग उभारणीचे पाऊल टाकले आहे. त्यात रेडिमेड गारमेंट, टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, आदी उद्योग आणि सेवा उद्योगांचा समावेश आहे. त्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून मदत मिळाली आहे. उद्योग क्षेत्रातील महिलांचा टक्का वर्षागणिक वाढत आहे.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्य शासनाकडून राबविण्यात येतो. या अंतर्गत महिलांना सेवा उद्योग व्यवसायासाठी दहा लाख, तर उद्योगासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यात शहरी भागातील महिलांना दहा, तर ग्रामीण भागामधील महिलांना ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान (सबसिडी) दिले जाते. या रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मंजुरीची पात्रता, अटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया फार किचकट नाही. त्यामुळे आणि कोरोनाने उद्योग, व्यवसायाचे महत्त्व समजल्याने महिलांची पावले उद्योग उभारणीच्या दिशेने पडली आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राने सन २०१९मध्ये राष्ट्रीय बँकांकडे शिफारस केलेली सुमारे शंभर कर्जप्रकरणे मंजूर झाली. गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रकरणांचा आकडा ६५वर आला. यावर्षी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ८८ प्रकरणे मंजूर होऊन उद्योग सुरू झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मिती झाली आहे.
या उद्योगांची उभारणी
मसाला उत्पादन, फॅशन डिझायनिंग, रेडिमेड गारमेंट, टेलरिंग, पिठाची गिरण, लोणचे उत्पादन, ब्युटी पार्लर, काजू उत्पादन, आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातून मंजूर झालेल्या २५ लाखांच्या कर्जातून गारमेंट प्रिटिंगचा उद्योग सुरू केला. त्यातून वीस जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचा आता विस्तार करणार आहे. - स्वाती पाटील, लाभार्थी, कोरोची
कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग उभारणीमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असून, हे चांगले चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची महिलांना मदत होत आहे. - सतीश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
लाभार्थींना प्रशिक्षण
या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून उद्योग उभारणाऱ्या लाभार्थींना दहा दिवसांचे आणि दोन लाखांपर्यंतच्या सेवा प्रकल्पांना सहा दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते.