कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:23 AM2017-08-17T01:23:07+5:302017-08-17T01:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शहरवासीयांच्या हद्दवाढीच्या मागणीला पूर्णविराम देत राज्य सरकारने अखेर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांच्या संतुलित विकासासाठी ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. या संदर्भातील अधिसूचनेवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, त्याची अधिकृत शासकीय अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात एक-दोन दिवसांत प्रसिद्ध होईल. प्राधिकरणाबाबतची अधिसूचना बुधवारी राज्य सरकारचे सहसचिव श्री. द. लांडगे यांनी जारी केली.
‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हद्दवाढीच्या प्रश्नावरून शहर आणि ग्रामीण जनता
असा निर्माण झालेला वाद संपुष्टात आला असून, कोल्हापूर शहर आणि त्याच्या परिसरातील ४२ गावांचा संतुलित तसेच नियंत्रित विकास होण्याचा मार्गही
मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणातून शहरालगतच्या शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहती तसेच वडगाव व कागल या नगरपालिका वगळण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे क्षेत्र विकास प्राधिकरण यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागासाठी स्थापन झाले असून, त्याचे परिणामही चांगले दिसून येत आहेत.
कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय कृती समितीने हद्दवाढ मागताना शहराला लागून असलेली १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींची मागणी केली होती. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले होते. तथापि, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई येथे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीऐवजी हा प्राधिकरणाचा विषय समोर ठेवला होता. तो अखेर मान्य झाला.
पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेप्रमाणे प्राधिकरणात मात्र ४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे १८ गावांव्यतिरिक्त ज्या २४ गावांचा नव्याने प्राधिकारणात समावेश झाला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घेतला जाणार निर्णय अन्यायकारक होईल, अशी भावना या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या गावांचा होईल समावेश
नव्याने अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणात ४२ गावांचा समावेश आहे. त्यामध्ये शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली, वळिवडे, गांधीनगरसहित चिंचवाड, मुडशिंगी (न्यू वाडदेसहित) सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे-मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव यांचा समावेश आहे. मात्र, यामधून कागल, वडगाव वगळण्यात आले आहे.
ं२४ गावांतील ग्रामस्थांची होणार बैठक : चंद्रदीप नरके
दरम्यान, ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे मार्ग असलेले घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली, चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणारा निधी, तसेच शासनाकडून येणारा निधी याला कोणतीही बाधा येणार नसेल.
२ तसेच त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळणार असेल तर प्राधिकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
३ तथापि, अचानक ज्या २४ गावांचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांशी आधी चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.