कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संस्थेची स्थापना, अध्यक्षपदी अमर अडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:14 PM2020-09-26T18:14:45+5:302020-09-26T18:21:30+5:30
दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण करणाऱ्या जिल्ह्यातील ७० संस्थांची शिखर संस्था म्हणून कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी ही संस्था संलग्न असून, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर : दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण करणाऱ्या जिल्ह्यातील ७० संस्थांची शिखर संस्था म्हणून कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी ही संस्था संलग्न असून, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
डा. अडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. अडके म्हणाले, व्यक्तिगत आणि वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांना सामूहिक आयाम मिळावा, यासाठी हे सर्वसमावेश व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. देशविदेशांत गिर्यारोहण करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मार्गदर्शन आणि साहाय्य करता यावे, कोल्हापूर जिल्ह्यातून गिर्यारोहक तयार व्हावेत यासाठी सर्व संस्थांचे अस्तित्व स्वतंत्र ठेवून या जिल्हास्तरीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व संस्थांनी आणि व्यक्तींनीही या संस्थेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी करण्यात आली असून, ८ जून २०२० ज्या आदेशानुसार अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही संलग्नता दिली असल्याचे सांगण्यात आले.
संस्थेचे अन्य पदाधिकारी
हेमंत साळोखे (उपाध्यक्ष), सागर पाटील (सचिव), कोषाध्यक्ष (डॉ. विश्वनाथ भोसले), राजेश पाटील (सहसचिव), पंडित पोवार, दशरथ गोडसे (मार्गदर्शक सदस्य), विनोद साळोखे, नितीन देवेकर, विजय ससे, रामदास पाटील, साताप्पा कडव, महेश पाटील, प्रकाश मोरबाळे, सागर नलवडे, प्रशांत साळोखे, मुकुंद हावळ, ओंकार हावळ, सागर पाटील, योगेश रोकडे, सुजित जाधव, यशपाल सुतार, सुचित हिरेमठ (सर्व सदस्य).