मावळा कोल्हापूरकडून ‘मावळा फोर्स’ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:49+5:302021-02-17T04:28:49+5:30
कोल्हापूर : मावळा कोल्हापूरच्यावतीने यंदाचा शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये कोरोना प्रादुर्भावात ८०० हून ...
कोल्हापूर : मावळा कोल्हापूरच्यावतीने यंदाचा शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये कोरोना प्रादुर्भावात ८०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पुणे येथील अरुण जंगम आणि कुटुंबियांचा आज, बुधवारी, मावळा पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार असल्याची माहिती ‘मावळा कोल्हापूर’चे संस्थापक-अध्यक्ष उमेश पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘मावळा फोर्स’ या आपत्कालीन सेवा संस्थेची स्थापनाही यावेळी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोवार म्हणाले, मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथे दरवर्षी मावळा कोल्हापूर शिवजयंती उत्सव साजरा करते. यावर्षी तीन दिवस कोरोनाचे नियम पाळून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये आज, बुधवारी सकाळी ११ वाजता नेत्र व दंत तपासणी शिबिर, मावळा पुरस्कार आणि मावळा फोर्सची स्थापना केली जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता मावळा कोल्हापूर प्रस्तुत विनोद साळोखे लिखित, दिग्दर्शित ‘आग्ऱ्याहून सुटका’ या महानाट्याचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सलग तीन दिवस सायंकाळी ७ वाजता मिरजकर तिकटी येथे हा नाट्यप्रयोग सुरू राहणार आहे.
आमदार चंद्रकांत जाधव, उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याहस्ते उद्या, गु्रुवारी सायंकाळी ६ वाजता कोरोना योध्द्यांचा सत्कार होणार आहे. मधुरिमाराजे छत्रपती, प्रतिमा सतेज पाटील, जयश्री चंद्रकांत जाधव यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा होणार आहे.
पत्रकार परिषदेला विनोद साळोखे, संतोष हेब्बाळी, युवराज पाटील, रामदास पाटील, सोमेश पोवार आदी उपस्थित होते.